लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणीसाठी फक्त एक दिवसाची मुदतवाढ दिली असून विद्यार्थ्यांना उद्या मंगळवार, ११ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे.
विद्यार्थ्यांनी https://muugadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर जाऊन पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करायची आहे.
आणखी वाचा-नीट निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्या, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सूचना
दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणीसह विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्या महाविद्यालयांचे ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज भरणेही बंधनकारक आहे. तसेच, विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी ही प्रत्येक महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे त्यांच्या स्तरावर जाहीर करावी, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नावनोंदणीसाठी सोमवारी (१० जून) दुपारी १ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र विद्यापीठाने या प्रक्रियेला एक दिवस मुदतवाढ दिली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार गुरूवार, १३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल.