मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईतील तापमानात वाढ होऊन वातावरणातील गारवा काहीसा कमी झाला आहे. दरम्यान, मुंबईत दोन दिवस ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील तापमानात दोन दिवसांपासून वाढ झाली आहे. त्यामुळे गारवा कमी होऊन दिवसभर उकाडा सहन करावा लागत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथील तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदले गेले. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी विभोक्षाच्या (थंड वाऱ्याचा झंझावात) प्रभावामुळे मुंबईत गुरुवारपर्यंत ढगाळ वातावरणाचा अंदाज असून, या कालावधीत मुंबईतील काही भागांत हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर राज्यातील इतर भागातही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच किमान तापमानातील चढ – उतार कायम राहील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

होही वाचा…नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे

दरम्यान, उत्तर भारतात १०० नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत वाहत आहेत. त्यामुळे थंडीमध्ये चढ-उतार होत असून, काही भागात दाट धुके कायम आहे. राज्यातील किमान तापमानातही काही अंशी घट- वाढ होत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच ढगाळ वातावरणाचा देखील थंडीवर परिणाम होत आहे. त्यामुळे दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Last two days temperature in mumbai increased and dew in atmosphere has reduced mumbai print news sud 02