गेल्या वर्षी पावसाच्या तडाख्यात चाळण झालेल्या रस्त्यांची महापालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करून दुरुस्ती केली. मात्र गेल्या दहा दिवसांत कोसळलेल्या पावसामुळे या रस्त्यांची पार दैना उडाली असून पादचाऱ्यांना चालणे आणि वाहनचालकांना वाहन हाकणेही अवघड बनू लागले आहे. या खड्डेमय रस्त्यांमुळे पालिकेच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून करदात्या मुंबईकरांचे कोटय़वधी रुपये पाण्यात गेले आहेत.
दरवर्षी पावसाळा आणि खड्डेमय रस्ते असे समीकरणच बनून गेले आहे. गेल्या वर्षी अवघी मुंबई खड्डेमय झाल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. तसेच मुंबईतील वाहतुकीवरही त्याचा प्रचंड परिणाम झाला होता. मुंबईकरांना गुळगुळीत रस्ते देण्याचा संकल्प शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीने लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सोडला आणि मुंबईतील लहानमोठय़ा असंख्य रस्त्यांची कामे मोठय़ा प्रमाणावर हाती घेण्यात आली. त्यासाठी कोटय़वधी रुपयांची कंत्राटदारांवर खैरात करण्यात आली. निवडलेल्या खड्डेमय रस्त्यांपैकी काहींची कामे तातडीने हाती घेण्यात आली आणि पावसाळ्यापूर्वी धावतपळत ही कामे पूर्णही करण्यात आली. मात्र एकाच वेळी असंख्य रस्त्यांची कामे हाती घेतल्याने मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. पावसाळा जवळ येताच काही कंत्राटदारांनी कामे आटोपती घेतली. उर्वरित कामे आता पावसाळ्यानंतर करण्यात येणार आहेत. मात्र कंत्राटदारांनी घिसाडघाईत खड्डय़ांमध्ये माती लोटून रस्त्यांवरील खड्डे बुजवले असून पावसाच्या तडाख्यात या रस्त्यांची चाळण होऊ लागली आहे.
गेल्या वर्षी पावसाळा ओसरल्यानंतर पालिकेने काही रस्त्यांवर पडलेले खड्डे डांबरमिश्रित खडीने भरले आणि रस्ते गुळगुळीत करण्याच्या प्रयत्नात ते आणखी ओबडधोबड बनले. आता पावसाच्या तडाख्यात गेल्या वर्षी बुजविलेले खड्डे पुन्हा उखडले असून डांबरमिश्रित खडी रस्त्यांवर अस्ताव्यस्त पसरली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांचे मोठय़ा प्रमाणावर अपघात होऊ लागले आहेत.