बाबांची आज ७१ वी पुण्यतिथी आहे. यंदाचे वर्ष भारतीय चित्रपटाचे शताब्दी वर्ष आहे. बाबांनी म्हणजेच मास्टर दीनानाथांनीसुद्धा चित्रपट केलेत. ‘कृष्णार्जुन युद्ध’ या चित्रपटात त्यांनी अर्जुनाची भुमिका साकारली होती. त्यात त्यांनी गायलेली गाणी सुद्धा गाजली, असे सांगत लतादिदींनी बाबांच्या आठवणी जागविल्या.
मास्टर दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्ट्स तर्फे आयोजित मास्टर दीनानाथ स्मृती पुरस्कार सोहळयात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध गायिका शमशाद बेगम यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली.
लतादिदी म्हणाल्या की, बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त दिल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला रसिकांनो तुम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही भरभरून प्रतिसाद दिला. आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे यानिमित्त एलएम म्युझिक या माझ्या कंपनीतर्फे बाबांनी गायलेल्या गाण्यांच्या दोन सीडी प्रकाशित केल्या आहेत. एचएमव्हीने त्यांच्याजवळील मास्टर दीनानाथांच्या रेकॉर्डस आम्हाला दिल्या. त्यामुळेच आम्ही सीडी प्रकाशित करु शकलो. आज बाबांची ७१ वी पुण्यतिथी आहे आणि चित्रपट क्षेत्रात येऊन मलाही ७१ वर्षे पूर्ण झाली, असे लता मंगेशकर यांनी सांगताच रसिक श्रोत्यांनी कडाडून टाळ्या वाजविल्या.
सुरेश वाडकर यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार, चार दशके नाटय़सेवा केल्याबद्दल अभिनेत्री वंदना गुप्ते यांना मास्टर दीनानाथ विशेष पुरस्कार, जुनी नाटके पुनरुज्जिवीत केल्याबद्दल सुनिल बर्वे यांना मोहन वाघ पुरस्कार, रस्त्यावरच्या मुलांसाठी काम करणाऱ्या नीला श्रॉफ यांच्या वात्सल्य फाऊंडेशनला आनंदमयी पुरस्कार, ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांना वाग्विलासिनी पुरस्कार देण्यात आला. शेती क्षेत्रातील वैशिष्टय़पूर्ण कामगिरीबद्दल गणपतराव पाटील यांना गौरविण्यात आले. आदिशक्ती पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित नव्हत्या. प्रत्येकी १ लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. सर्व पुरस्कार विजेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा