श्रद्धांजली सभेत उदय सामंत यांची घोषणा
मुंबई : आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय उभारण्याचे लता मंगेशकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न केले. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या हयातीत महाविद्यालयाच्या जागेचे भूमिपूजन होऊ शकले नाही. परंतु उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा कलीना येथील तीन एकरचा भूखंड या महाविद्यलयासाठी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. लवकरच याचे भूमिपूजन होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी सांगितले.
प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने माटुंगा येथील रुईया महाविद्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. यावेळी सामंत यांनी संगीत महाविद्यालयाला कलिना येथे जागा देण्याचे जाहीर केले.
‘लता मंगेशकर यांची गाणी कायमच ओठांवर असायची. पण त्यांना प्रत्यक्षात कधी भेटता येईल असे वाटले नव्हते. दोन वर्षांपूर्वी लता मंगेशकर यांच्या वाढदिवशी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही भेट घडवून आणली. ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय’ व्हावे अशी त्यांची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. त्यामुळे राज्य शासनाने हे महाविद्यालय उभारण्याचे निश्चित केले. त्यासाठी मंगेशकर कुटुंबियांसह संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांची समिती उभारण्यात आली. काही तांत्रिक अडचणींमुळे महाविद्यालयाला जागा मिळण्यास अडचण आली. परंतु या महाविद्यालयासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा कलिना येथील ३ एकरचा भूखंड देण्याचे निश्चित केले आहे,’ असे सामंत म्हणाले.
ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर यांनी ऑनलाईन माध्यमातून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. ‘जगाने केवळ तिच्यावर प्रेम केले नाही तर तिच्यावर श्रध्दा ठेवली. ती संगीतातला आठवा सूर होती. ती गेल्याने संगीताचा युगांत झाला,’ अशा भावना हृदयनाथ मंगेशकर यांनी यावेळी व्यक्त केल्या.