ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्याचं वृत्त समोर आल्यानंतर शनिवारी (५ फेब्रुवारी २०२२) दिवसभर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये मान्यवरांनी लता मंगेशकर यांची भेट घेतली. रात्री नऊच्या सुमारास ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी देखील लता मंगेशकर यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं. तसेच आम्ही प्रार्थना करत असल्याचं नमूद केलं.
आशा भोसले म्हणाल्या, “मला आशा आहे की लता मंगेशकर चांगल्या होतील. लोक आणि आम्ही देखील प्रार्थना करत आहोत. डॉक्टरांनी सांगितलं की लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे.”
व्हिडीओ पाहा :
लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली, पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवल्याची रुग्णालयाची माहिती
दरम्यान, प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक आहे. काही काळापूर्वी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत होती. मात्र आता त्यांची तब्येत पुन्हा बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्या सध्या आयसीयूमध्ये आहेत.
काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाली होती. त्यासोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसंच डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी सांगितलं.
लता मंगेशकर या ९२ वर्षांच्या आहेत. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना करोनाची व न्यूमोनियाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या लवकर बरे व्हाव्यात यासाठी अनेक जण प्रार्थना करत आहे.