मुंबई : स्वातंत्र्योत्तर काळातील प्रत्येक पिढीला सुख,दु:ख आणि सर्व भावनांचा उत्सव स्वरांतून पकडणारी गानप्रतिनिधी म्हणून आपलीशी वाटणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर यांनी रविवारी सकाळी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
तबकडीच्या रेकॉर्डयुगापासून ते कॅसेटरिळांची बेगमी करणारे दर्दी आणि चकचकत्या सीडीजगतापासून ते चावीसम पेनड्राईव्हमधून संगीताचे चलन-वहन करणाऱ्या आजच्या भिरभिरत्या कानसेनांना स्वरांनी समृद्ध करणाऱ्या लताबाईंच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा दाटली.
लताबाईंच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचा अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रांतील मान्यवर आणि संगीतप्रेमींची गर्दी लोटली होती.
करोनाचा संसर्ग झाल्याने लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना सौम्य लक्षणे होती. परंतु हळूहळू त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. गेल्या आठवडय़ात त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीशी सुधारणा झाली होती. मात्र या आठवडय़ात पुन्हा त्यांची प्रकृती ढासळली. त्यामुळे त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. शनिवारी त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली आणि अवयव निकामी झाल्यामुळे रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे ब्रीच कॅन्डी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले. करोना संसर्गातून त्या बऱ्या झाल्या होत्या. परंतु करोनापश्चात त्यांच्या आजारात अधिक गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांचे निधन झाले, असे ब्रीच कॅन्डी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एन संथनम यांनी सांगितले.
ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून दुपारी त्यांचे पार्थिक पेडर रोड येथील प्रभुकुंज निवासस्थानी आणण्यात आले. चित्रपटसृष्टीतील तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी प्रभुकंज येथे लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेतले. पेडर रोड येथून दुपारी ४ च्या सुमारास लता मंगेशकर यांची अंत्ययात्रा शिवाजी पार्कच्या दिशेने निघाली. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास अंत्ययात्रा शिवाजी पार्क मैदानात पोहोचली. त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अंत्ययात्रा शिवाजी पार्क मैदानात पोहोचल्यानंतर लता मंगेशकर यांचे पार्थिक अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, खासदार सुप्रिया सुळे, अनिल देसाई, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली तेंडुलकर, अभिनेता शाहरुख खान, आमीर खान, गायक शंकर महादेवन, अनुराधा पौडवाल, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, मधुर भांडारकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी शिवाजी पार्क मैदानात लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. नरेंद्र मोदी यांनी मंगेशकर कुटुंबियांचे सांत्वन केले.
लष्कर, नौदल आणि हवाई दलातर्फे लता मंगेशकर यांना शिवाजी पार्क मैदानात मानवंदना देण्यात आली. त्यानंतर हृदयनाथ मंगेशकर यांनी लता दिदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
‘मेरी आवाज ही पहचान हैं’, ‘अखेरचा हा तुला दंडवत’, ‘ए मेरे वतन के लोगो’ अशी गाणी गात रसिकांनी शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. ‘लता दीदी अमर रहे’ अशा घोषणांनी शिवाजी पार्क दुमदुमून गेले.
अखेरच्या दर्शनातला दंडवत..
* लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने पसरले आणि शोकाकुल चाहत्यांनी पेडर रोड येथील त्यांच्या प्रभुकुंज या निवासस्थानी धाव घेतली. तेथे चित्रपटसृष्टी, राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी अंत्यदर्शन घेतले. पेडर रोडवर लताबाईंच्या चाहत्यांची गर्दी लोटली होती.
’लताबाईंचे पार्थिव प्रभुकुंजमधील निवासस्थानी काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याची वार्ता पसरल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी तिकडे धाव घेतली. दुपारी दुपारी १.१५च्या सुमारास त्यांचे पार्थिव प्रभुकुंजवर आणण्यात आले. त्यावेळी प्रभुकुंजलगतच्या रस्त्यावर चाहत्यांची गर्दी वाढू लागली. पार्थिव दर्शनासाठी आलेल्या लोकांना पोलिसांनी प्रभुकुंजपासून दूरवर थांबवले.
* संगीत, चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी प्रभुकुंजवर लताबाईंच्या अंत्यदर्शनासाठी आली होती. फुलांनी सजविलेल्या लष्कराच्या वाहनावर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. पेडर रोड येथून दुपारी ४ च्या सुमारास अंत्ययात्रा शिवाजी पार्क मैदानाच्या दिशेने निघाली. विविध क्षेत्रांतील दिग्गज मंडळी, सर्वसामान्य नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. वरळी नाका, पोद्दार रुग्णालय, कँडलरोड मार्गे अंत्ययात्रा शिवाजी पार्क मैदानात दाखल झाली.
* लताबाईंचे अखेरचे दर्शन घेता यावे यासाठी अंत्ययात्रेच्या मार्गावर मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. वरळी नाक्यावर दुतर्फा प्रचंड गर्दी झाली होती. ‘लतादीदी अमर रहे’, ‘जबतक चांद सूरज रहेगा लतादीदी तेरा नाम रहेगा’ अशा घोषणा देत नागरिक त्यांना श्रद्धांजली वाहत होते. शिवाजी पार्क मैदानातही नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.
अवघ्या तीन तासांत नियोजन
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर प्रचंड जनसागर रस्त्यावर येण्याची शक्यता लक्षात घेऊन दादर येथील शिवाजी पार्क मैदानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आता. सकाळी १० च्या दरम्यान पालिकेला याबाबत सूचना मिळाल्या. शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार होणार असल्याने मुख्यमंत्र्यांची परवानगी घेण्यात आली. दुपारी ३ वाजता पार्थिव शिवाजी पार्क येथे येणार असल्याने आमच्या हातात केवळ तीन तास होते. या तीन तासांत पोलीस प्रशासनाच्या मदतीने पालिकेच्या सर्व विभागांनी मिळून चोख व्यवस्था केली. गर्दी होऊ नये यासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वेगवेगळी प्रवेशद्वारे उपलब्ध करण्यात आली. नागरिकांनाही व्यवस्थित अंत्यदर्शन घेता यावे यासाठी रांगेची व्यवस्था करण्यात आली. पंतप्रधान स्वत: या वेळी उपस्थित राहणार असल्याने पालिकेवर मोठी जबाबदारी होती, असे जी उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून लताबाईंचे अंत्यदर्शन
मुंबई : लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी पार्क येथे पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.
पंतप्रधान मोदी यांनी शिवाजी पार्कवर जाऊन लताबाईंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर यांच्यासह मंगेशकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. पंतप्रधान मोदी काही वेळ शिवाजी पार्कवर उपस्थित होते.
लताबाईंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पंतप्रधान मोदी रविवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, तिन्ही सेनादलांचे अधिकारी आणि अन्य उच्चपदस्थ विमानतळावर या वेळी उपस्थित होते. पंतप्रधानांचे आगमन झाले तेव्हा विमानतळावर आदित्य ठाकरे हे राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्र्यांनी जाण्याचे टाळले.
अंत्यसंस्कारास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अनिल देसाई आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लताबाईंच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि रुग्णालयात पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
मुख्यमंत्र्यांची विचारपूस
शिवाजी पार्क मैदानात आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही विचारपूस केली. या वेळी मुख्यमंत्र्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.