Lata Mangeshkar Passes Away : “लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे. भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही. ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे. आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे. ” अशा शब्दांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धाजंली अर्पण केली आहे.

भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे आज निधन झाले आहे. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. लतादीदींच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून सर्वच मान्यवरांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

Lata Mangeshkar Passes Away Live : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीटद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. “ ‘ऐ मेरे वतन के लोगो’तून प्रत्येकाच्या अश्रूंना वाट मोकळी करून देण्याचे सामर्थ्य जसे त्यांच्या सुरांमध्ये होते, तसेच अनेकांच्या आयुष्यातील स्वप्नांना आणखी उंच भरारी घेण्यासाठी बळ देण्याचे काम लतादीदींच्या सुरांनी केले. वृद्ध असो की तरुण लतादीदींच्या सुरात रममाण न होणारा विरळाच!” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

आयुष्याच्या अखेरपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निस्सिम भक्ती –

तसेच, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निस्सिम भक्ती आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी जपली. वीर सावरकरांच्या विचारांची तन-मन-धनाने सेवा करण्याचे काम लतादीदींनी केले. प्रखर राष्ट्रवाद जपणारे हे संपूर्ण मंगेशकर कुटुंब लतादीदींनी कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून जपले. त्यांची विविध कार्यक्रमांमध्ये अनेकदा भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस असायची. भेट झाली नाही, तर फोन करून ‘कसा आहेस देवेंद्र’ हे शब्द मोठ्या बहिणीची उणीव भरून काढणारे असायचे. त्यांचे जाणे, ही माझी सुद्धा वैयक्तिक आणि मोठी हानी आहे.” अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी लतादीदींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

त्या स्वर्गातूनही सुरांची बरसात नक्कीच करतील –

याचबरोबर, “लतादीदींचे स्वर हे कायम आपल्यासोबत राहणार आहेत, हेच सांगत स्वत:ची समजुत करून घ्यायची, एवढेच आता आपल्या हाती आहे. त्या स्वर्गातूनही सुरांची बरसात नक्कीच करतील. भारतरत्न लतादीदींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! मंगेशकर कुटुंबीय, संपूर्ण भारतवासियांच्या दु:खात मी सहभागी आहे. ॐ शांती.” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Story img Loader