वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी घर सोडलेल्या आशाने काबाडकष्ट करून आताचे  अद्वितीय स्थान मिळविले आहे. संसाराची कसरत सांभाळताना आम्हा भावंडांकडून काही एक न मागता ती यशस्वी झाली. त्यामुळे तिला पुरस्कार देण्याचा आनंद वेगळाच आहे, असे भावपूर्ण उद्गार भारतरत्न लता मंगेशकर यांनी रविवारी येथे काढले. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयनाथ पुरस्काराने दीदींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी हृदयनाथ यांच्यासह मीना, उषा या मंगेशकर भगिनीही आवर्जून उपस्थित होत्या.
हृदयनाथ म्हणाला त्याप्रमाणे आई-वडिलांचा आशीर्वाद लाभल्याने आम्ही सर्वजण उत्तम गाऊ लागलो. स्वत:च्या पायावर उभे राहिलो. सर्व भावंडांनी कीर्ती ऐश्वर्य संपादन केले. तरीही आमचे घर बघितले तर तुम्हा मध्यमवर्गीयांप्रमाणेच आहे आणि त्यामुळेच मी आज तुमच्यात बसले आहे, असे मनोगत लता मंगेशकर यांनी व्यक्त केले.
या सत्काराला उत्तर देताना आशा भोसले यांनी नेहमीप्रमाणे चौफेर फटकेबाजी केली. आजचा कार्यक्रम मोठा अजबच आहे. मंगेशकर भावंडांबद्दल नेहमी काही ना काही तरी अफवा पसरविल्या जातात. मात्र कोणीही काहीही बोलले हाताची पाच बोटे एकत्र येतातच, असे त्यांनी ठसक्यात सांगितले. एकेकाळी दीदीच्या कौतुकासाठी मी आसुसलेली असायचे आणि आज तिच्याच हातून मला पुरस्कार मिळतोय. त्यामुळे आजवर मिळालेल्या अनेक पुरस्कारांपेक्षा हा पुरस्कार माझ्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे, असे भावपूर्ण उद्गार त्यांनी काढले.
अविनाश प्रभावळकर यांनी माझ्यावरील प्रेमापोटी २३ वर्षांपूर्वी हृदयेश आर्ट्स ही सांस्कृतिक संस्था सुरू केली आणि गेल्या वर्षीपासून माझ्या नावाने पुरस्कार देणे हेही सुरू केले. माझ्या नावाने पुरस्कार देण्याएवढा मी मोठा आहे का असा प्रश्न मला स्वत:लाच पडतो. मात्र सध्याचे संगीत ऐकले की फार वाईट संगीत दिलेले नाही असाही विचार मनात आला, असे मिष्किल उद्गार हृदयनाथ मंगेशकर यांनी काढले. जगातील सर्व रसिकांवर सहा दशके ज्यांनी आपल्या स्वरांची बरसात केली त्या दोन महागायिका आज आपल्यासमोर आहेत, हे आपल्या सर्वाचे भाग्य आहे, असेही ते म्हणाले.
पुरस्कार सोहळ्यानंतर ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमातून आशा भोसले यांनी आपल्या चतुरस्र गायकीची बरसात उपस्थितांवर केली. या वेळी हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, राम कदम आदी संगीतकारांची ‘मागे उभा मंगेश’, ‘का रे दुरावा’, ‘मलमली तारूण्य माझे’, ‘नभ उतरू आलं’, ‘गेले द्यायचे राहून’, ‘थकले रे नंदलाला’, ‘चांदणे शिंपीत जाशी’ गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलेच. त्याचबरोबर अनेक गायकांच्या नकलाही त्यांनी केल्या. कार्यक्रमाला रसिकांची अलोट गर्दी झाली होती. कार्यक्रमाचे निवेदन सुधीर गाडगीळ यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले.
आशाबाईंचा नृत्याविष्कारही!
रसिकश्रोत्यांवर आपल्या सुरांची बरसात तर आशाबाईंनी केलीच. पण हृदयनाथ-आशाबाई यांनी ‘आम्ही ठाकर ठाकर’ हे गाणे एकत्र गायले. विशेष म्हणजे हे गाणे सादर करताना आशाताईंना चक्क हातात काठी घेऊन नृत्य करताना पाहून श्रोते हरखून गेले. त्यानंतर त्यांनी ‘रॅम्पवॉक’ करून या सगळ्यावर कडी केली.
धनादेश दुष्काळग्रस्तांसाठी
बाबांचे आणि आम्हा भावंडांचे छायाचित्र असल्याने या पुरस्कारासोबत देण्यात आलेले सन्मानचिन्ह मी जपून ठेवणार आहे. मात्र मला देण्यात आलेला एक लाख रुपयांचा गौरवनिधी मी मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळग्रस्त निधीसाठी देत आहे, असे जाहीर करून आशा भोसले यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय दिला.

Story img Loader