आयग्रा चाचण्यांसाठी निविदा जाहीर
शैलजा तिवले
मुंबई : मुंबईतील क्षयरोग निर्मूलनासाठी महत्त्वाच्या अशा सुप्त क्षयरोग संसर्गाचे (लेटंट टीबी) मापन व विश्लेषण हा प्रकल्प व्यापक स्तरावर सुरू होणार आहे. या प्रकल्पाअंर्तगत आवश्यक आयग्रा (इंटरफेरॉन गॅमा रिलीज आसाय) चाचण्यांच्या निविदा पालिकेने जाहीर केल्या असून खासगी प्रयोगशाळांची नियुक्ती केली जाणार आहे.
क्षयरोगाची बाधा झालेल्या व्यक्तींच्या सातत्याने संपर्कात असणाऱ्या व्यक्तींमध्ये सुप्त क्षयरोगाची बाधा झाल्याची शक्यता अधिक असते. सुप्त क्षयरोग म्हणजे व्यक्तीच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू सुप्तावस्थेत असतात. सुप्त क्षयरोगाने बाधित असलेल्या व्यक्तीमध्ये भविष्यात ‘सक्रिय क्षयरोग’ उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे सुप्त क्षयरोगाचे वेळीच निदान होऊन त्यावर योग्य उपचार केल्यास संबंधित व्यक्तीस भविष्यात सक्रिय क्षयरोग होण्यापासून प्रतिबंध करणे शक्य आहे. यादृष्टीने सुप्त क्षयरोगाचे मापन व विश्लेषण करणारा प्रकल्प पालिकेने सप्टेंबर २०२१ मध्ये हाती घेतला.
या प्रकल्पाअंतर्गत बाधित आढळणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक उपचार सुरू केले जाणार आहेत. सुप्त क्षयरोगाच्या संसर्गाचे निदान करण्यासाठी ‘आयजीआरए’ किंवा ‘आयग्रा’ चाचणी करावी लागते. या चाचण्या पालिकेच्या प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध नसून यासाठी खासगी प्रयोगशाळांशी करार करण्यात येणार आहे. रक्ताचे नमुने संकलित करणे आणि अहवाल देणे ही जबाबदारी खासगी प्रयोगशाळांची असेल.
क्षयरोग बाधित रुग्णांच्या नातेवाईकांची यादी
सुरुवातीला हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविला असून जानेवारीपासून शहरात व्यापक स्तरावर राबविण्यात येणार होता. परंतु खासगी प्रयोगशाळेची नियुक्तीची प्रक्रिया रखडल्यामुळे हा प्रकल्प अजून सुरू होऊ शकलेला नाही. आयग्रा चाचणीमध्ये व्यक्तीचे रक्ताचे नमुने घेतले जातात. या चाचणीचा अहवाल सामान्यपणे चाचणी केल्यापासून २४ तासांमध्ये मिळतो. आयग्रा चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांसाठी निविदा जाहीर केल्या असून लवकरच याची नियुक्ती केली जाईल. यानंतर व्यापक स्तरावर या प्रकल्पाची सुरुवात केली जाणार आहे. यासाठी जानेवारीपासून नव्याने निदान झालेल्या क्षयरोग बाधित रुग्णांच्या नातेवाईकांची यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. या सर्व व्यक्तींच्या चाचण्या केल्या जाणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या क्षयरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रणिता टिपरे यांनी दिली.
५० टक्के नातेवाईक बाधित
प्रायोगिक तत्त्वावर राबविलेल्या प्रकल्पामध्ये क्षयरुग्णांच्या संपर्कातील ५०० जणांच्या आयग्रा चाचण्या केल्या गेल्या. यातील सुमारे ५० टक्के व्यक्तींमध्ये सुप्त क्षयरोग असल्याचे आढळले आहे. या व्यक्तींना प्रतिबंधात्मक उपचारदेखील सुरू केले आहेत. यासंबंधी विश्लेषणात्मक अभ्यास सुरू असून लवकरच याचे निष्कर्ष जाहीर केले जातील, असे डॉ. टिपरे यांनी सांगितले.