मुंबई : Jalna Lathi Charge in Maratha Reservation Protest आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजातील निर्दोष बांधवांवर सरकारच्या आदेशानेच जालन्यात अमानुष लाठीमार केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. देशभरातील महत्त्वाच्या पक्षांचे नेते मुंबईत ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीसाठी आले असताना या बैठकीचा संदेश देशभर जाऊ नये व आघाडीच्या बैठकीपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सत्तेतील भाजपने जालन्याची घटना घडवून आणली आहे, असा आरोप पटोले यांनी केला आहे.
सत्तेत आल्यावर २४ तासांत आरक्षण देण्याच्या वल्गना देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या. धनगर, मराठा या समाजाला आरक्षण देतो, अशी आश्वासने फडणवीस यांनीच दिली होती. मग आता काय झाले, अजून आरक्षण का दिले नाही. ‘ओबीसी’ आरक्षणाचा घोळसुद्धा फडणवीस यांनीच घातला आहे. आणि ते विरोधकांवर आरोप करतात. याला चोराच्या उटल्या बोंबा म्हणतात. जनतेने भाजपचा खरा चेहरा ओळखला असून भाजपला सत्तेतून बाहेर बसवण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.