मुंबई महापालिकेच्या सुरक्षा रक्षक भरतीसाठी भांडूप संकुलामध्ये इच्छुकांची गर्दी उसळल्यामुळे पोलिसांना उमेदवारांवर सौम्य लाठीमार करावा लागला.
महापालिकेतील सुरक्षा रक्षकांची ९६८ पदे भरण्यात येणार असल्यामुळे सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून बेरोजगार युवकांची भांडूप संकुलामध्ये रिघ लागली होती. त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईकही तेथे आले होते. त्यामुळे या परिसरात सकाळपासूनच गोंधळ उडाला. सकाळी ८ वाजेपर्यंत आलेल्या युवकांना भांडूप संकुलात सोडण्यात आले. मात्र त्यानंतर आलेल्यांना प्रवेशद्वारावरच अडविण्यात आले. आपण नियोजित वेळेत आलो असल्यामुळे आपल्याला आतमध्ये सोडावे अशी मागणी ते करीत होते. त्यांची समजूत काढताना सुरक्षा रक्षक आणि पालिका अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. सुरुवातीला पोलिसांनीही सुरक्षा रक्षक भरतीसाठी आलेल्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे अखेर पोलिसांना जमावावर सौम्य लाठीमार करावा लागला.
 सर्व प्रवर्गातील उमेदवारांना एकाच दिवशी बोलावण्यात आल्यामुळे भांडूप संकुलामध्ये सुमारे २५ हजार युवकांची गर्दी झाली.
दरम्यान, ही भरती प्रक्रिया येत्या २० एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती  पालिकेचे सहआयुक्त एस. एस. शिंदे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा