मुंबई : Naroda village riot case गुजरातमधील नरोदा गाम दंगलप्रकरणातील ६७ आरोपींची  निदरेष सुटका ही ‘कायद्याचे राज्य आणि संविधानाची’ हत्या आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी केली. राष्ट्रवादी काँग्रेसने घाटकोपर येथे अयोजित केलेल्या एकदिवसीय शिबिराच्या सांगता समारंभात पवार बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

  नरोदा गाम दंगलप्रकरणी अटक झालेल्यांमध्ये एक महिला नेत्या होत्या. त्या मंत्रीही होत्या. या सर्वाची निर्दोष सुटका झाली, यावरून सरकारी यंत्रणा कशी काम करते, हेच स्पष्ट होते, असे पवार म्हणाले. सध्या सक्तवसुली संचालनालाय (ईडी), सीबीआय यासारख्या संस्थांचा गैरवापर केला जात आहे. आम्ही म्हणू तसाच देश चालला पाहिजे, ही मानसिकता प्रबळ झाली आहे, असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला. या प्रवृत्तीविरोधात आपल्याला संघर्ष करायचा असून, याची कितीही मोठी किंमत चुकवावी लागली तरी मागे हटायचे नाही, असा निर्धार पवार यांनी व्यक्त केला.

  पुलवामा हल्ल्याबद्दल भाष्य करताना पवार म्हणाले, या जवानांना नेण्यासाठी विमानाचा वापर करावा, अशी मागणी तत्कालीन राज्यपालांनी केली होती. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. हल्ल्यानंतर त्रुटींकडे बोट दाखविण्यााऱ्या राज्यपालांना शांत राहण्यास सांगण्यात आले. केंद्र सरकार मनमानी कारभार करत आहे, अशी टीका पवार यांनी केली. आता ग्रामीण भागांत दोन मुलांमध्ये भांडणं झाली तर ‘ईडी’ मागे लावेल, अशी धमकी दिली जाते. इतकी ही व्यवस्था खालपर्यंत पोहोचली आहे, अशी खोचक टीकाही पवार यांनी केली.  या मेळाव्यात खासदार प्रफुल्ल पटेल,सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी मार्गदर्शन केले. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष राखी जाधव यांनी हा मेळावा आयोजित केला होता.

‘खारघर दुर्घटनेची न्यायाधीशांमार्फत चौकशी करा’

‘‘खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ वितरण सोहळय़ात झालेल्या दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेस राज्य सरकार जबाबदार आहे. त्यामुळे याची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत करण्यात यावी’’, अशी मागणीही पवार यांनी केली. ‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्य सरकारचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी निमंत्रित म्हणून राज्य सरकारचीच असते. या सोहळय़ाद्वारे सरकारला शक्तिप्रदर्शन करून त्यातून निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करायचे होते, अशी टीकाही पवार यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Law and order constitution sharad pawar criticism verdict naroda village riot case ysh