मुंबई : बी.एड, एम.एड, एम.पी.एड आणि विधी तीन वर्ष या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेला राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांना अधिकाधिक विद्यार्थ्यांना अर्ज करता यावेत यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली. सर्व अभ्यासक्रमांना नोंदणीसाठी एक महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर अर्ज नोंदणी करण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आला. बी.एड आणि विधी तीन वर्ष या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत विद्याथी व पालकांकडून सीईटी कक्षाकडे मेल, पत्राद्वारे विनंती करण्यात येत होती. याची दखल घेऊन सीईटी कक्षाकडून या अभ्यासक्रमांना अर्ज नोंदणी करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज नोंदणी करण्यास मुदतवाढ दिली आहे. विधि तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेला २७ डिसेंबरपासून सुरुवात झाली होती. त्यानंतर २८ जानेवारी रोजी आणि १३ फेब्रुवारीपासून अर्ज नाेंदणी करण्यास मुदतवाढ दिली आहे.
आतापर्यंत विधी तीन वर्षे अभ्यासक्रमासाठी ८६ हजार ८५६ विद्यार्थ्यांनी अर्ज नाेंदणी केली. त्यातील ६५ हजार ९७ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चिती केली आहे. तर २१ हजार ७५९ विद्यार्थ्यांचे अर्ज प्रक्रियेमध्ये आहेत. त्याचप्रमाणे बी.एड अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेला २८ डिसेंबरपासून सुरूवात झाली. या अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत १ लाख १४ हजार ८७९ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. त्यापैकी ९२ हजार २७० विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चिती केली असून, २२ हजार ६०९ विद्यार्थ्यांचे अर्ज प्रक्रियेमध्ये आहेत. एम. एड अभ्यासक्रमासाठी ४ हजार ७४० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून, त्यापैकी ३ हजार १२० विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चिती केली आहे. तसेच एम.पी.एड अभ्यासक्रमासाठी २ हजार ७४३ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून, त्यातील २ हजार १२० विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चिती केली आहे. विधि तीन वर्षे आणि बीएड अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा मिळत असलेला प्रतिसाद आणि २१ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी शुल्क भरलेले नाही. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने त्यांना परीक्षेची संधी मिळावी यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता या विद्यार्थ्यांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. मात्र यापुढे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.