उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका गाडीत आढळलेली स्फोटकं आणि त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मुंब्रा येथे आढळलेला मृतदेह या प्रकरणाने सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाने आक्रमक होत या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर काल(शनिवार) सकाळपासून एनआयएकडून वाझेंची चौकशी सुरू होती. सलग १३ तास चाललेल्या चौकशीनंतर अखेर वाझे यांना अटक करण्यात आली आहे. स्फोटकं असलेली गाडी अंबनींच्या घराबाहेर उभा करण्यात वाझेंचा सहभाग असल्याचा आरोप एनआयएने केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

अंबानी स्फोटकं प्रकरणी सचिन वाझे यांना ‘एनआयए’कडून अटक

“मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीमध्ये आढळलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडल्याच्या घटनांची NIA आणि ATS मार्फत चौकशी केली जात आहे. या चौकशीतून जे काही निष्पन्न होईल, त्यावर राज्यसरकार आणि केंद्रसरकारकडून कायदेशीर कारवाई केली जाईल.” असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

सत्र न्यायालयाने फेटाळलेली अंतरिम अटकपूर्व जामीनाची याचिका फेटाळून लावल्यानंतर वाझे यांच्यावर एनआयएने कारवाई केली आहे.

…यामुळे राज्यात अस्थिरता आणि मुंबई पोलिसांवर दबाव; संजय राऊतांनी व्यक्त केली नाराजी

तर, सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर शिवसेना नेते राऊत यांनी ‘एएनआय’शी संवाद साधला. राऊत म्हणाले, “सचिन वाझे हे अत्यंत प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकार आहे, यावर माझा विश्वास आहे. अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या जिलेटीन कांड्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एका संशयास्पद मृत्यू प्रकरणातही. या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी मुंबई पोलिसांची आहे. त्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणांची गरज नाही. आम्ही एनआयएचा आदर करतो. पण, आपल्या पोलिसांनी सुद्धा याचा तपास केला असता. मुंबई पोलीस आणि एटीएस यांचाही आदर केला जातो, पण केंद्रीय तपास यंत्रणा वारंवार हस्तक्षेप करून मुंबई आणि मुंबई पोलिसांचं खच्चीकरण करत आहे. यंत्रणा राज्यात अस्थिरता निर्माण करत असून, मुंबई पोलीस आणि प्रशासनावर दबाब निर्माण करत आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

Story img Loader