Lawrence Bishnoi vs Salman Khan: गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवुड अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सातत्याने धमक्या येत आहेत. मुंबई काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर बिश्नोई गँगकडून सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याची धमकी देणारे फोन कॉल येत आहेत. सलमानशी ज्यांची जवळीक आहे, त्यांनाही बिश्नोई गँगनं धोक्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी यात अधिक सखोल तपास सुरू केला आहे. त्यातच आता खुद्द सलमान खानसाठी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. त्याच्या शुटिंगमध्ये घुसून एका व्यक्तीनं ‘बिश्नोई को बुलाऊं क्या?’ अशी धमकी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

बुधवारी मुंबईच्या दादर परिसरात अभिनेता सलमान खान एका चित्रपटाचं शूटिंग करत होता. यावेळी त्याच्या सेटवर एक अज्ञात व्यक्ती फिरत असल्याचं लक्षात आलं. काही वेळानंतर त्या व्यक्तीला हटकून विचारणा करण्यात आली, तेव्हा त्याच्याकडून अरेरावीची भाषा सुरू झाली. अखेर त्याला बाहेर जाण्यास जेव्हा सांगण्यात येऊ लागलं, तेव्हा त्यानं थेट लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेऊन धमकवायला सुरुवात केली!

काळवीट शिकार प्रकरणापासून लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. काहीवेळा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचेही प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे अशा प्रकारे चित्रपटाच्या सेटवर अज्ञात व्यक्तीने घुसून थेट बिश्नोईच्या नावाने धमकी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. या व्यक्तीला बाहेर जाण्यास सांगितलं असता “बिश्नोईला फोन करून बोलवू का?” असं ही व्यक्ती म्हणू लागली.

पोलिसांनी घेतलं ताब्यात

हा सगळा प्रकार पाहून सेटवरील लोकांनी तातडीनं पोलिसांना पाचारण केलं. त्यांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं. शिवाजी पार्क पोलीस स्टेशनवर या व्यक्तीला नेण्यात आलं असून त्याची सखोल चौकशी केली जात आहे.

Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिष्णोई सलमान खानच्या मागे हात धुवून का लागलाय? वाचा २६ वर्षांचा घटनाक्रम

सलमान खान विरुद्ध लॉरेन्स बिश्नोई गँग

या वर्षी एप्रिल महिन्यात सलमान खानच्या बंगल्याबाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी घरावर गोळीबार केला होता. त्याची जबाबदारी नंतर बिश्नोई गँगनं घेतली. त्यानंतर बाबा सिद्दिकींच्या हत्या प्रकरणातही बिष्णोई गँगकडून सलमान खानच्या नावानं धमकी देण्यात आली. सलमान खानला मदत करणाऱ्यांना आणि त्याच्या जवळच्या राजकीय व्यक्तींना धोका असल्याची धमकी बिश्नोई गँगकडून देण्यात आली.

१९९८ साली हम साथ साथ है चित्रपटाच्या शूटिंगवेळी राजस्थानमध्ये सलमान खानने काळवीटाची शिकार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्याचा प्रदीर्घ खटलाही चालला. बिश्नोई समाजासाठी काळवीट पवित्र मानलं जातं. त्यामुळे बिश्नोई गँगनं सलमान खानला लक्ष्य करायला सुरुवात केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lawrence bishnoi name toggled salman khan shooting unknown person detained pmw