मुंबईः कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले आहे. अनमोल अमेरिकेत असल्याची माहिती भारतीय यंत्रणांना मिळाल्यानंतर त्याला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणासाठी प्रस्ताव पाठवला होता.
अनमोलला कॅलिफोर्नियामध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरण आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अनमोल बिश्नोई सहभागी आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अलिकडेच अनमोल बिश्नोईची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. एनआयएने अनमोल बिश्नोईविरुद्ध २०२२ मध्ये नोंदवलेल्या दोन प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल केले आहे. गेल्या महिन्यात, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष मोक्का न्यायालयात अनमोलला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली होती.
हेही वाचा >>> मतदार केंद्रावर भ्रमणध्वनी घेऊन जाण्यास बंदीच; निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेपास उच्च न्यायालयाचा नकार
वांद्रे परिसरातील अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर १४ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या गोळीबार प्रकणात लॉरेन्स आणि अनमोल बिश्नोईविरोधात गुन्हा दाखल आहे. अनमोल बिश्नोईने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबारा केल्याच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. याशिवाय अनमोल माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील आरोपींच्या संपर्कात होता. याशिवाय प्रसिद्ध गायक सिद्धु मुसेवाला हत्येप्रकरणातही त्याचा सहभाग आहे. बनावट पारपत्राच्या आधारे तो भारतातून पळून गेला होता. तो कॅनडा व अमेरिकेत ठिकाण बदलून राहत होता. याशिवाय केनियामध्येही तो गेला होता, अशी माहिती आहे. अनमोलविरोधात १८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. लॉरेन्सचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई सध्या टोळी चालवत आहे. लॉरेन्स कारागृहात असताना अनमोल त्याचे आर्थिक व्यवहार सांभाळत होता.