पुण्याच्या जर्मन बेकरी स्फोटाप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या हिमायत बेग याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप करीत या स्फोटाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) नव्याने तपास करण्याची मागणी एका वकिलाने उच्च न्यायालयाकडे केली आहे.
अ‍ॅड्. फिरोझ अन्सारी यांनी ही याचिका केली असून स्फोटाचा नव्याने तपास करण्याचे आदेश ‘एनआयए’ला द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. स्फोटाचा तपास करणाऱ्या राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नेहमीच स्फोटांप्रकरणी निष्पाप तरुणांना अटक करून त्यांना गोवले आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासिन भटकळ याला करण्यात आलेल्या अटकेच्या पाश्र्वभूमीवर ‘एनआयए’ला या स्फोटाचा नव्याने तपास करण्याचे आदेश देण्याची विनंती अन्सारी यांनी केली आहे.
जर्मन बेकरी स्फोटाचा ‘एनआयए’कडून नव्याने तपासाची मागणी करणारी ही दुसरी याचिका आहे. याआधी पत्रकार आशिष खेतान यांनीही हीच मागणी करीत याचिका केली होती. बेगने फाशीच्या शिक्षेला आव्हान दिले आहे. या व अन्य याचिकांवरील सुनावणी २९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव सध्या आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात वास्तव्याला असलेल्या बेगची पुन्हा येरवडामध्ये पाठवणी करण्याची विनंती कारागृह प्रशासनाकडून न्यायालयाकडे करण्यात आली. त्यावरील सुनावणीही २९ ऑक्टोबर रोजीच होणार आहे.

Story img Loader