लक्ष्मण श्रेष्ठ हे आजच्या मुंबईकर अमूर्त चित्रकारांपैकी महत्त्वाचे आणि वयाने ज्येष्ठ चित्रकार. (त्यांच्या आडनावाचा ‘श्रेष्ठा’ हा इंग्रजी वळणाचा उच्चार अधिक रूढ आहे.) मूळचे नेपाळचे आणि मुंबईच्या ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट’मध्ये शिकायला आल्यापासून मुंबईकरच झालेल्या श्रेष्ठ यांनी अमूर्त चित्रांच्या ‘मुंबई शैली’ला दिशा देणारे व्ही. एस. गायतोंडे यांचा प्रभाव स्वीकारला; पण स्वत:ची वाट वेगळीच राखली. ही वाट कोणती? या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला प्रत्यक्ष पाहता येणार आहे!
लक्ष्मण श्रेष्ठ यांच्या चित्रांचं सिंहावलोकनी प्रदर्शन सध्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’मधल्या (पूर्वीचं ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियम’) ‘जहांगीर निकल्सन कला दालना’त भरलं आहे. हे प्रदर्शन दोन टप्प्यांत आहे. पहिला टप्पा ३ ऑक्टोबपर्यंत सुरू राहणार आहे आणि दुसरा टप्पा १४ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर असा आहे. पहिल्या टप्प्यात सन १९६३ ते १९८८ या काळात श्रेष्ठ यांनी केलेली चित्रे आहेत.
श्रेष्ठ हे बिहारमध्ये- पाटण्यातही शिकले होते. पण त्यांची चित्रकार म्हणून सुरुवात ‘जेजे’तून झाली आणि शिष्यवृत्तीवर ते पॅरिसला गेले. तिथून परतल्यावर अगदी स्वत:साठी केलेले १९६३ सालचे एक मानवाकृतिप्रधान चित्र इथे आहे (या मजकुरासोबत त्याचे छायाचित्रही आहे. या चित्राचे शीर्षक- ‘इन्टेंट’). त्यातल्या मानवाकृतीचा रंग, पॅलेटनाइफचे तिरके फटकारे आणि त्यातून साधल्या गेलेल्या पोताला आकृतीपेक्षाही अधिक महत्त्व, ही वैशिष्टय़े अमूर्तीकरणाकडे नेणारीच होती, असे आता म्हणता येते. परंतु १९७० च्या आसपास, निसर्गदत्त महाराज आणि गायतोंडे यांच्याशी ओळख वाढल्यावर श्रेष्ठ यांची चित्रे बदलू लागली. समुद्र, नेपाळचा विस्तीर्ण हिमालयीन टापू, यांचा विस्तार त्यांच्या चित्रांत हळूहळू येऊ लागल्या. अशा एका अमूर्त चित्राला ‘लँडस्केप’ असं शीर्षकही श्रेष्ठ यांनी दिल्याचे इथे प्रदर्शनात दिसते, त्यामुळे श्रेष्ठ यांची अमूर्तचित्रे कुठून आली, या प्रश्नाच्या उत्तराची मोठी किल्लीच प्रेक्षकाला गवसते.
पुढली सारी चित्रे आधी नुसती पाहावीत.. डोळ्यांत साठवून घ्यावीत. कदाचित एखादेच चित्र नंतरही आठवेल.. आपल्या अनुभवातून त्या चित्राचा ‘अर्थ’ उलगडेल. काही वेळा एकाच चित्रातून एकापेक्षा अधिक अनुभव आठवू लागतील.. ही अनुभव आठवण्याची पद्धत अनेक अमूर्त चित्रकारांना अजिबात आवडणार नाही. तुम्ही चित्राकडेच का नाही पाहत, असे ते म्हणतील. त्यांचे जास्त बरोबर आहे, खरे. पण या प्रदर्शनात तशी सुरुवात अगदी शेवट-शेवटच्या चित्रांपाशी होते. श्रेष्ठ यांच्या चित्रांमध्ये ‘अॅनालिटिकल क्युबिझम’ या कलेतिहासामधल्या प्रकारासारखा तुटकपणा दिसू लागतो. पुढे मात्र ते केवलाकारी अमूर्ताकडे वळले आहेत आणि ‘हाच माझा रंग’ अशी संकेतबद्धताही न पाळता सर्वच रंगांचा वापर करू लागले आहेत, असे अखेरची दोन-तीन चित्रे आपल्याला सांगतात.. ही चित्रे १९८०च्या दशकाअखेर रंगवलेली आहेत. त्यानंतर श्रेष्ठ यांच्या चित्रांमध्ये भरपूर रंग दिसू लागले. एवढे रंग निसर्गात एकावेळी असणे अशक्य आहेत असेच पाहणाऱ्याला वाटावे, इतके जास्त हे रंग होते. ती चित्रे कदाचित पुढल्या टप्प्यात दिसतील.
जहांगीर निकल्सन यांनी आयुष्यभर आधुनिक चित्रांचा संग्रह केला व मृत्यूनंतर हा संग्रह आपल्याच नावाने कायमचा जतन करणाऱ्या संस्थेला मिळावा, अशी त्यांची इच्छा ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’ने पूर्ण केली. लक्ष्मण श्रेष्ठ हे निकल्सन यांचे एक आवडते चित्रकार, त्यामुळे श्रेष्ठांची सुमारे ५६ चित्रे त्यांच्या संग्रहात आहेत. ती विविध कालखंडांतली आहेत.
निवडक विदेशी आणि देशी चित्रकारांची चित्रे याच प्रदर्शनाच्या पहिल्या भिंतीवर मांडली आहेत. श्रेष्ठ यांच्या मुलाखतीची चित्रफीतही या दालनातच आहे. या साऱ्याच्या परिणामी, अमूर्त परंपरा आणि श्रेष्ठ यांबद्दल काहीच माहिती नसणाऱ्यांनाही मुंबईच्या कलेतिहासातल्या एक महत्त्वाच्या चित्रकाराची ओळख होईल. त्यासाठी म्युझियमच्या तिकिटाचे ७० रुपये मोजावे लागले, तरी बाकीचे संग्रहालय पाहता येणे हा ‘बोनस’ आहेच!
पापुद्रय़ांवरली माणसं!
‘राइस पेपर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अगदी तलम, नाजूक आणि अर्धपारदर्शक कागदाचे पापुद्रे एकमेकांवर जोडून, जाड कागद बनवून त्यावर हलक्या जलरंगांचे अनेक थर देऊन सिजी कृष्णन यांची चित्रे घडली आहेत. ही चित्रे मोठय़ा आकारात- किमान चार फूट ते कमाल सात फूट लांबीची आणि साडेतीन ते चार फूट उंचीची- असूनही माणसे अगदी लहान आकाराची आहेत.. या माणसांची एक ओळ चित्राच्या मधोमध दिसते, एका रेषेत. ही माणसे साधारण एका कुटुंबातली वाटताहेत, पण बऱ्याचदा नेहमीच्या माणसांसारखी ती नाहीत, हेही लक्षात येते आहे.. एका चित्रातल्या सर्व जणांना दाढी किंवा मिशा आहेत.. दुसऱ्या चित्रात एखादा अवयव जास्तीचा असलेली माणसेच दिसताहेत.. हे कुठेही कर्कश किंवा बीभत्स वाटत नाही, कारण एक तर ती माणसे अगदी एकमेकांसारखीच आहेत आणि मुख्य म्हणजे छान हलक्या फिक्कट रंगांमध्ये ती साकार झाल्यामुळे ती फार अनाग्रही, निसर्गत:च त्या कागदावर वसलेली अशी वाटतात!
..कल्पना करणे आणि कल्पनेच्या पलीकडे जाणे हा सिजी कृष्णन या चित्रकर्तीच्या चित्रांचा स्थायिभाव आहे. चित्रात बरीच माणसे रंगवूनही, त्यापैकी प्रत्येक जण वेगवेगळे दिसतात ते या कल्पनाशक्तीमुळेच. मात्र, त्या माणसांना कोणतेही सामाजिक अस्तित्वच नाही, असेही प्रेक्षकाला वाटू शकेल.
सिजी कृष्णन हिच्या चित्रांचे प्रदर्शन ताजमहाल हॉटेलच्या मागल्या ‘मेरिवेदर रोड’ या रस्त्यावर ‘सनी हाऊस’ इमारतीत पहिल्या मजल्यावरल्या ‘गॅलरी मीरचंदानी + स्टाइनऱ्यूक’ या कलादालनात भरले आहे. व्हिडीओ कॅमेरायुक्त डोअरबेलचा पहारा असलेल्या लाकडी दाराआड तीन खोल्यांची ही गॅलरी आहे.