दुष्काळदट्टय़ाने झालेल्या धान्यटंचाईमुळे गेल्या आठवडाभरापासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या धान्य बाजारातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ होऊ लागली आहे. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, तूरडाळ, मूगडाळीच्या दरांमध्ये किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली असून साबूदाणा, काबुली चण्याच्या दरानेही प्रतिकिलो ६० ते ७०चा आकडा ओलांडला आहे. उत्तम प्रतीचा शेंगदाणा ९० रुपयांनी विकला जात आहे. या दरांमुळे किरकोळ बाजारातील संभाव्य दरवाढ आधीच महागाईत पोळणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणार आहे.ह्ण

वाढ किती, कशी?
गेल्या महिन्याच्या तुलनेत अन्नधान्याच्या घाऊक बाजारात सर्वच धान्याचे दर पाच ते सात रुपयांनी वाढले असून, किरकोळ बाजारातही याहून अधिक दरवाढ झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सूत्रांनुसार तूरडाळ (७७ प्रति किलो), उडीद डाळ ( ७०), मसूर डाळ (५५) अशा सर्वच डाळींचे दर वधारल्याचे चित्र दिसू लागले आहे. बाजरीचे दर पाच रुपयांनी वधारले असून उत्तम प्रतीची बाजरी २५ रुपयांनी, तर ज्वारी ३५ रुपये किलो या दराने विकली जात आहे. घाऊक बाजारात तांदळाचे दर स्थिर असले तरी उत्तम प्रतीचा गहू मात्र महागला आहे. एम. पी. सेव्हूर जातीचा गहू किलोमागे ३२ रुपयांनी विकला जात आहे, तर एरवी १६ ते २० रुपये किलो असे सरासरी दर असणारा गहू २२ ते २७ रुपयांनी विकला जात आहे.

दुष्काळाचा परिणाम जाणवू लागल्याने अन्नधान्याच्या दरात वाढ झाली आहे; डाळींच्या दरांमधील वाढ तुलनेने तुरळक आहे. – प्रमोद जिरापुरे, उपसचिव, एपीएमसी   

Story img Loader