स्थानिक संस्था कराला (एलबीटी) विरोध करण्यासाठी गेले काही दिवस व्यापाऱ्यांनी बंद पाळला. त्यामुळे लोकांचे अतोनात हाल होत आहेत. आता सर्वोच्च न्यायालयानेही निकाल दिला असून तुमच्या मागण्यासाठी सरकारशी जरूर चर्चा करा. मात्र यापुढे दुकाने बंद ठेवून जनतेला वेठीस धरल्यास मनसेला तुमची दुकाने उघडावी लागतील, असा सज्जड दम मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी दिला.
काही ठिकाणी दुकाने सुरू करण्यात आली आहेत, तर काहीजण अजूनही दुकाने बंद ठेवून जनतेला वेठीस धरू पाहात आहेत. तुमच्या मागण्यांसाठी सरकारशी जरूर वाटाघाटी करा, मात्र लोकांना वेठीला धरण्याचे उद्योग यापुढे मनसे सहन करणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे.
यापूर्वीही एलबीटीला समर्थन मिळावे म्हणून व्यापाऱ्यांच्या संघटनेने राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळीही दुकाने बंद ठेवून लोकांना त्रास देऊ नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही व्यापाऱ्यांच्या संघटनांनी दुकाने बंद ठेवून दादागिरी केली. त्यामुळे जनतेची अडवणूक होत आहे. असले प्रकार मनसे सहन करणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा