मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरून कोणत्याही प्रकारची ओढाताण नाही. जिंकेल त्याचा मतदारसंघ असे सूत्र राज्यातील महाविकास आघाडीत ठरले आहे. हे सूत्र काँग्रेस, राष्ट्रवादी ( शरद पवार गट) आणि शिवसेना ( ठाकरे गट) यांच्या प्रमुख नेत्यांना मान्य आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. मात्र महाविकास आघाडीत जागा वाटपाचे कोणतेही सूत्र ठरलेले नसताना राऊत यांनी हे सूत्र जाहीर केल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात चलबिचल सुरू झाली आहे.
हेही वाचा >>> धनगर समाजाचा चिकित्सा अहवाल बासनात; महाधिवक्ता यांच्या अभिप्रायाविना अहवाल शासनाला परत
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे संविधान वाचविण्याची मोठी जबाबदारी असून २०२४मध्ये मोदी पुन्हा सत्तेत आले तर विरोधी पक्षाचे नेते हे तिहार तुरुंगात असतील, ही भीती खरी ठरण्याची शक्यता राऊत यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीबाबत ‘इंडिया’ आघाडीची जागा वाटपाबाबत पुढील बैठकीत चर्चा होणार आहे. त्या अगोदर ठाकरे गटाचे नेते राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सूत्र जाहीर केले. राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघात काँग्रेस, राष्ट्रवादी ( शरद पवार गट), शिवसेना ( ठाकरे गट) या पक्षांचे जे संभाव्य उमेदवार निवडून येतील, त्यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे, असे राऊत यांनी जाहीर केले.