चोरलेल्या वाहनांमधून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक करण्यात गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांना यश आले. यापूर्वी त्याच्या पाच साथीदारांना गुन्हे शाखेने अटक केली होती. पोलिसांनी या सर्वांकडून एकूण ६४ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
हेही वाचा >>> मुंबई : ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ला जर्मनीकडून अर्थसहाय्य; लवकरच अंदाजे ४१८९ कोटी रुपयांचे कर्ज मिळणार
मुंबई शहरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका सराईत टोळीतील पाच आरोपीना काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखा परिमंडळ ६ च्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. मात्र या टोळीचा म्होरक्या रईम खान (३८) पोलिसांना सापडत नव्हता. दोन दिवसांपूर्वी रईम खान कुर्ला परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. अधिकाऱ्यांनी कुर्ला परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. तपासात त्याच्याकडे चरस, एमडी आणि ब्राऊन शुगर हे अमली पदार्थ सापडले. तसेच वाहनांच्या अनेक बनावट चाव्याही त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्या.