मुंबई : विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणतीही विवक्षित तरतूद नाही, असे विधिमंडळ सचिवालयाने स्पष्ट केल्यानंतर शिवसेनेने भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी, असे पत्र दिले. परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आली नाही. या संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही, असे सांगत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेला तंगविल्याची चर्चा सुरू आहे.

विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाल्यानंतर शिवसेनेचे भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाची निवड जाहीर करावी, अशी मागणी केली. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय हा अध्यक्षांनी घ्यायचा आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय अध्यक्षांच्या कोर्टात टोलावला. अध्यक्ष नार्वेकर यांनी अद्याप निर्णय झालेला नाही, असे सांगितले. लगेचच निर्णय जाहीर करणार नाही, असेही संकेत दिले. संविधानावरील चर्चेच्या वेळी काँग्रेसचे नाना पटोले यांनी अद्याप वेळ गेलेली नाही. विरोधी पक्षनेतेपदाची निवड जाहीर करावी, अशी मागणी केली.

शिवसेनेला (ठाकरे) विरोधी पक्षनेतेपद देण्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यास शिवसेनेला उगाचच बळ दिल्यासारखे होईल, असा मतप्रवाह महायुतीमध्ये होता. यातूनच शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद देण्याचे टाळल्याची चर्चा आहे.

तेव्हा २० आमदार असतानाही विरोधी पक्षनेतेपद

विरोधी महाविकास आघाडीत सर्वाधिक २० आमदार असल्यानेच शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. १९८७ मध्ये २० आमदार असलेल्या जनता पक्षाला तर १३ आमदार असलेल्या ‘शेकाप’ला विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले होते. हा पूर्व इतिहास असताना अध्यक्ष नार्वेकर हे मुद्दामहून विलंब लावत असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.