पोलीस अधिकाऱ्याने आमदाराशी केलेल्या गैरवर्तनाचे व विधान भवनातच त्याला झालेल्या मारहाणीचे प्रकरण ताजे असतानाच गुरुवारी विधान परिषदेत पोलिसांच्या एकूणच उद्दामपणावर सर्वपक्षीय आमदारांनी कडाडून टीका केली. पोलिसांच्या मनमानीला आळा घालणार की नाही, असा सवाल गृहमंत्री आर.आर.पाटील यांना विचारण्यात आला.
विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी लोकमान्य टिळक पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१० ते २०१२ या कालावधीतील खून, दरोडे, घरफोडय़ा, चोऱ्या यांची माहिती १२ मार्च २०१२ ला वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे मागणी केली होती. परंतु त्यांनी माहिती दिली नाही. या संदर्भात तावडे यांनीच प्रश्न विचारला होता. विरोधी पक्षनेत्यालाही पोलीस जुमानत नाहीत, तर सर्वसामान्य माणसांशी ते कसे वागत असतील, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसचे भाई जगताप यांनीही पोलिसांच्या मनमानीला आळा घालणार की नाही, अशी विचारणा केली. त्यावर या प्रकरणाची अतिरिक्त पोलीस महासंचालकांमार्फत १५ दिवसांत चौकशी करून संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही आर.आर.पाटील यांनी दिली.

Story img Loader