मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसला गळती लागली असून अनेक नेत्यांची भाजप किंवा मित्रपक्षांत सामील होण्यासाठी रीघ लागली आहे. वडिलांपासून काँग्रेसचे विचार रुजलेले नेतेही भाजप व भाजपच्या सहकारी पक्षात प्रवेश करीत आहेत. पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात मोठे राजकीय हादरे बसणार असून काँग्रेससह अन्य पक्षांतील अनेक नेतेही भाजपबरोबर येणार असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व अन्य वरिष्ठ नेत्यांनी केला आहे.
भाजपने आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक मतदारसंघ जिंकण्यासाठी अन्य पक्षातील कोणत्या नेत्यांचा उपयोग होईल, यादृष्टीने नियोजन केले आहे. संबंधित नेत्याने भाजपमध्ये प्रवेश करायचा की सहकारी पक्षात, याबाबतचे धोरणही बहुतांश प्रकरणांमध्ये भाजपच ठरवीत आहे. काँग्रेसचे माजी खासदार मिलींद देवरा यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे वडील मुरली देवरा हे ज्येष्ठ काँग्रेस नेते होते आणि दीर्घकाळ केंद्रीय मंत्री होते. गांधी घराण्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. मिलींद देवरा यांचेही ज्येष्ठ नेते राहुल गांधींसह काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चांगले संबंध होते. पण राजकीय भवितव्याच्या दृष्टीने देवरा हे भाजपबरोबर सत्तेत असलेल्या शिंदे गटात सामील झाले.
बाबा सिद्धीकी हे गेली अनेक वर्षे काँग्रेसमध्ये कार्यरत होते. मात्र त्यांनीही नुकताच काँग्रेसला रामराम ठोकून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचा मुलगा झिशान सिद्धीकी हे काँग्रेसचे आमदार असून सध्या ते तेथेच असले, तरी विधानसभा निवडणुकीआधी तेही त्याच मार्गाने जाण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी पक्षांबरोबर राहिल्यास अधिक लाभ होईल, या जाणीवेतून सिद्धीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा सोयीचा पर्याय निवडला आहे.
अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी आयुष्यभर काँग्रेसचे काम केले आणि ते गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते. उच्चशिक्षीत असलेल्या अशोक चव्हाण यांच्यावर लहानपणापासूनच काँग्रेसच्या विचारांचे संस्कार झाल्याने ते गेली ४० वर्षांहून अधिक काळ पक्षाचे काम करीत आहेत. पक्षाने त्यांना आमदार, खासदार, प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्रीपदही दिले होते. तरीही त्यांनी काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – मुंबई : साकीनाका हत्या प्रकरणातील आरोपींना सहा तासांत अटक
दीर्घकाळ काँग्रेसमध्ये काम केलेल्या कृपाशंकरसिंह, राजहंससिंह यांनीही काही काळापूर्वी काँग्रेस सोडून भाजपची वाट धरली. कृपाशंकरसिंहांना भाजपने प्रदेश उपाध्यक्षपद दिले, तर राजहंससिंह यांना विधानपरिषदेवर आमदारकी दिली आहे. अशोक चव्हाण यांना भाजप काय देणार, हे अद्याप जाहीर झाले नसले, तरी चौकशीचा ससेमिरा संपून त्यांना चांगला राजकीय लाभही मिळण्याची शक्यता आहे.