शिवसेना नेतृत्वाशी झालेल्या वादातून बाहेर पडलेले नारायण राणे, छगन भुजबळ, भास्कर जाधव या मंत्रिमंडळ सदस्यांसह काँग्रेस व राष्ट्रवादीत वेळोवेळी दाखल झालेले अनेक छोटे-मोठे नेते सध्या अस्वस्थ आहेत. शिवसेनेला बरे दिवस आल्याने यातील काही जण परतण्याच्या मार्गावर आहेत.
मुख्यमंत्रीपदाच्या अपेक्षेने राणे यांनी काँग्रेसप्रवेश केला, पण हे पद देण्यास काँग्रेसने टाळाटाळ केल्याने ते अनेक दिवस अस्वस्थ आहेत. काँग्रेस नेतृत्वाकडून आपल्या क्षमतेचा योग्य वापर केला गेला नाही, असा राणे यांचा आक्षेप आहे. मात्र, काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी राणे यांना गांभीर्याने घेतलेच नाही. छगन भुजबळ यांचेही राणे यांच्यासारखेच आहे. राष्ट्रवादीत अजित पवार यांचे प्रस्थ वाढले आणि भुजबळ यांचे महत्त्व कमी होत गेले. पक्षाने दोनदा उपमुख्यमंत्रीपद देऊनही भुजबळ यांची नाराजी दूर झालेली नाही.
 कोकणातील भास्कर जाधव यांचा अलीकडेच मंत्रिमंडळात फेरसमावेश करण्यात आला. गेल्या वर्षी  जाधव यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आणि त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. लोकसभेतील दारुण पराभवानंतर जाधव यांचे कट्टर विरोधक सुनील तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविण्यात आले. मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला तरी तटकरे यांच्याकडील महत्त्वाचे जलसंपदा खाते जाधव यांच्याकडे सोपविण्यात आले नाही. तसेच कोकणातील असूनही रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी तटकरे यांच्या विरोधामुळे जाधव यांच्या नावाचा विचार झाला नाही. जाधव यांचे चिपळूणमधील पक्षांतर्गत विरोधक रमेश कदम यांना पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्यात आला. तटकरे, उदय सामंत हे सारेच नेते विरुद्ध जाधव, असे चित्र सध्या राष्ट्रवादीमध्ये आहे. अर्थात, राष्ट्रवादी सोडण्याचा जाधव यांचा विचार असल्याची चर्चादेखील नाही.
‘मातोश्री’शी फाटल्याने बाहेर पडलेले अन्य एक मंत्री गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील संस्थांनाची जहागिरी पक्षाने मान्य केल्याने ते सध्या तरी तितकेसे नाराज नाहीत. उद्या नवी मुंबईत राष्ट्रवादीने अन्य कोणाला ताकद दिल्यास नाईक ते मान्य करण्याची शक्यता नाही.
राज ठाकरे यांच्याबरोबर मनसेमध्ये गेलेले शिवसेनेचे काही जुने पदाधिकारी वा कार्यकर्ते सध्या अस्वस्थ आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेले यश तर त्याच वेळी मनसेची झालेली पीछेहाट यामुळे कार्यकर्त्यांना आपल्या भवितव्याची चिंता भेडसावू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा