सुशीलकुमार शिंदे यांचे गृह खाते जाणार, शिंदे हे राज्यात परतणार किंवा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे केंद्रात जाणार, अशा गेले अनेक दिवस राज्याच्या राजकारणात चर्चिल्या जाणाऱ्या विषयाला मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पूर्णविराम मिळाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री दिल्लीत जाणार, महाराष्ट्रात सुशीलकुमार शिंदे येणार असे काही जण छातीठोकपणे सांगत होते. मुख्यमंत्री चव्हाण मात्र आपण दिल्लीला परतणार नाही, असे वारंवार सांगत होते. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराने मात्र सर्वच शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी राज्यात नेतृत्वबदलाची शक्यता कमी आहे. अर्थात मोहन प्रकाश हे राज्याच्या प्रभारीपदी कायम राहिल्याने मुख्यमंत्र्यांना किती मुक्त वाव मिळतो हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाची खाती राज्याकडून गेली
विलासराव देशमुख यांचे निधन व मुकूल वासनिक यांना वगळण्यात आल्यानंतर दोनदा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, पण महाराष्ट्राला कॅबिनेटमध्ये प्रतिनिधित्व मिळालेले नाही. सुशीलकुमार शिंदे हे एकमेव राज्यातील काँग्रेसचे नेते कॅबिनेटमंत्री आहेत. प्रतीक पाटील, मिलिंद देवरा आणि माणिकराव गावित यांच्यासह दिल्लीने महाराष्ट्रावर लादलेले राजीव शुक्ला हे चार राज्यमंत्री आहेत. गृह आणि कृषी ही दोनच महत्त्वाची खाती केंद्रात महाराष्ट्राकडे आहेत.

Story img Loader