मुंबई : मोठा गाजावाजा करीत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (‘एमएमआरसीएल’) ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले. हा टप्पा सोमवारपासून वाहतूक सेवेत दाखल झाला. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होऊन दोन दिवस होत नाही तोच तांत्रिक बिघाडामुळे आरे – बीकेसी दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली. आता या टप्प्यातील सांताक्रुझ मेट्रो स्थानकात गळती होऊ लागली आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा असल्याचा दावा करण्यात येत असलेल्या मेट्रो ३ मार्गिकेच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हेही वाचा >>> मुंबईत दसरा मेळावा आणि देवी विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; १५ हजार पोलीस तैनात
आरे – बीकेसी भुयारी मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा सोमवारी सकाळी ११ पासून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. मुंबईतील ही पहिली भुयारी मेट्रो असल्याने या मार्गिकेला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र अद्यापही या मार्गिकेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. या मेट्रोतून दररोज सरासरी २० हजार प्रवासी आरे – बीकेसी दरम्यान प्रवास करीत आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद हळूहळू वाढेल, असा विश्वास ‘एमएमआरसीएल’कडून व्यक्त करण्यात येत आहे. असे असताना आरे – बीकेसी टप्पा वाहतूक सेवेत दाखल होऊन दोन दिवस होत नाहीत तोच या मार्गिकेवरील वाहतूक बुधवारी विस्कळीत झाली. जवळपास ३० मिनिटे मेट्रो गाडी एकाच ठिकाणी उभी होती. ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. ही घटना ताजी असतानाच आता ‘मेट्रो ३’च्या बांधकामाच्या दर्जावर आणि सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करणारा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईला गुरुवारी मुसळधार पावसाने झोडपले आणि या पावसाने ‘मेट्रो ३’च्या बांधकामातील त्रुटी समोर आणल्या.
हेही वाचा >>> विरार – बोळींजमधील म्हाडा रहिवाशांना अखेर दिलासा, ९४०९ सदनिकाधारकांच्या मासिक सेवा शुल्कात कपात
आरे – बीकेसी टप्प्यातील सांताक्रुझ मेट्रो स्थानकात मोठ्या प्रमाणावर गळती होऊ लागली. मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच गळती होत होती. यावरून ‘एमएमआरसीएल’वर टीका होत आहे. दरम्यान या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली असून सांताक्रुझ स्थानकातील गळती बंद करण्यात आली आहे. गळती बंद करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याची माहिती ‘एमएमआरसीएल’कडून देण्यात आली. मेट्रो स्थानकावरील गटार तुडुंब भरल्याने मेट्रो स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून गळती झाल्याचेही ‘एमएमआरसीएल’कडून सांगण्यात आले. भविष्यात कोणत्याही मेट्रोस्थानाकावर अशी गळती होऊ नये वा इतर कोणत्याही समस्या उद््भवू नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असल्याचेही ‘एमएमआरसीएल’कडून सांगण्यात आले. स्थानकातील गळतीमुळे मेट्रोच्या संचलनावर कोणताही परिणाम झाला नसल्याचेही ‘एमएमआरसीएल’कडून स्पष्ट करण्यात आले.