मुंबई : वांद्रे पश्चिम परिसरातील स्वामी विवेकानंद मार्गावरील लकी जंक्शन येथील पाली जलाशयाला पाणीपुरवठा करणाऱ्या दोनपैकी एका ६०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीतून सोमवारी मध्यरात्री २ च्या सुमारास अचानक गळती सुरू झाली. पाणी गळती रोखण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. मात्र महापालिकेच्या एच पश्चिम विभाग कार्यालयातील वांद्रे (प.) आणि आसपासच्या परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मात्र महापालिकेने या परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पाणीपुरवठ्याचे विशेष वेळापत्रक तयार केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> तळोजास्थित गृहप्रकल्प कथित फसवणूक प्रकरण : सदनिका खरेदीदारांच्या दुर्दशेची न्यायालयाने घेतली गंभीर दखल

पाली जलाशयाला दोन मोठ्या जलवाहिन्यांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यापैकी ६०० मिलीमीटर व्यासाच्या एका मुख्य जलवाहिनीतून सोमवारी मध्यरात्री गळती होऊ लागली. गळतीचे वृत्त समजताच महापालिकेच्या जल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.

जलवाहिनीतून होत असलेल्या गळतीमुळे एच पश्चिम विभागातील (वांद्रे पश्चिम आणि आसपासचा परिसर) पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असून दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे. तथापि, काही भागात वेरावली जलाशय व उर्वरित दुसऱ्या पाली इनलेटद्वारे कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Weather Update : थंडीत आणखी वाढ होणार ? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासाठीचा अंदाज

दरम्यान, महापालिकेच्या एच-पश्चिम विभाग कार्यालयाच्या हद्दीतील वांद्रे पश्चिम येथील लकी जंक्शन परिसरातील जलवाहिनीच्या जोडणीचे काम प्रगतीपथावर आहे. या परिसरातील नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून पालिकेने पाणीपुरवठ्यासाठी विशेष वेळापत्रक आखले आहे. त्यानुसार दांडा कोळीवाडा, चुईम गाव, दांडपाडा, गजदरबंदचा काही भाग आणि खार पश्चिमेचा काही भागात रात्री ८ ते १० या वेळेत, तर डॉ. आंबेडकर मार्ग, पाली गाव, पाली पथर आणि खार पश्चिमेच्या काही भागात रात्री ११ ते मध्यरात्री १ या वेळेत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. उपरोक्त कालावधीत नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leakage from main water pipeline schedule for water supply disrupts in bandra area mumbai print news zws