लाखो लिटर पाण्याचा अपव्यय; मुंबई पालिकेला ७५ कोटी रुपयांचा भरुदड

सुमारे चार महिन्यांपूर्वी कूपनलिकेसाठी खोदकाम करताना ठाण्यातील वागळे इस्टेट औद्योगिक वसाहतीजवळून जाणाऱ्या जलबोगद्याला भगदाड पडले आहे. याबाबत ठाण्यातील एका नागरिकाने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेला जाग आली. प्रतिदिन तीन दशलक्ष लिटर पाण्याचा होणारा अपव्यय, जलबोगद्याच्या दुरुस्तीसाठी येणारा खर्च आणि दंड यापोटी ७५ कोटी रुपये संबंधिताकडून वसूल करण्यात यावे, असे पत्र मुंबई महानगरपालिकेने वागळे इस्टेट औद्योगिक वसाहतीला पाठविले आहे. त्याशिवाय मुंबई महानगरपालिकेने लागू केलेल्या १५ टक्के पाणी कपातीमुळे अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा होत असून मुंबईकरांना नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या १८ फूट व्यासाच्या जलबोगद्याला वागळे इस्टेट औद्योगिक वसाहतीजवळील रोड क्रमांक १६ येथे कूपनलिकेसाठी खोदकाम करताना भगदाड पडले असून ठाण्यातील १६ डिसेंबर २०२२ रोजी ठाण्यातील रहिवासी भारतकुमार पिसाट यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. एक बांधकाम व्यवसाय कंपनी कूपनलिकेसाठी खोदकाम करीत असताना जलबोगद्याची हानी झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापूर्वी २८ नोव्हेंबर २०२२ रोजीही गळतीची बाब निदर्शनास आली होती. यंत्रणेकडून हालचाल होत नसल्यामुळे पिसाट यांनी २८ मार्च २०२३ रोजी याप्रकरणी ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मात्र तोपर्यंत मुंबई महानगरपालिका अनभिज्ञच होती.

जलबोगद्याला भगदाड पडल्यापासून प्रतिदिन तीन दशलक्ष लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या विहित दरानुसार मूळ दंड अधिक ४०० पट रक्कम नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जलबोगद्याच्या दुरुस्तीपोटी सुमारे १४ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. जलबोगद्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे मुंबईत ३१ मार्च २०२३ पासून ३० दिवसांसाठी १५ टक्के पाणीकपात केली आहे. त्यामुळे मुंबईत अपुरा पाणीपुरवठा होत असून नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. दरम्यान, मुंबई पालिकेचे ७५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही रक्कम वसूल करण्यात यावी, अशी विनंती करणारे पत्र महापालिकेने घटनास्थळाचे नियोजन प्राधिकरण असलेल्या वागळे इस्टेट औद्योगिक वसाहतीला पाठविले आहे.

जल अभियंता विभागाची तारांबळ..

जलबोगद्याला भगदाड पडल्याचे चार महिन्यांनी कळल्यानंतर महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाची तारांबळ उडाली. आता श्रीनगर पोलीस ठाण्याने यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेला पत्र पाठविले असून जलबोगद्याला भगदाड पडल्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे किती नुकसान झाले याची माहिती उपलब्ध करावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leakage from water tunnel since four months amy