मुंबई : विक्रोळीमधील म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या नव्या कोऱ्या घरांमध्ये गळती सुरू झाली आहे. पहिल्याच पावसात विक्रोळीतील म्हाडा वसाहतीमधील अनेक घरांमध्ये गळती होऊन भिंती खराब होऊ लागल्या आहेत. त्यामुळे विक्रोळीतील विजेत्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून म्हाडाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
मुंबई मंडळाने ऑगस्ट २०२३ मध्ये ४०८२ घरांसाठी सोडत काढली होती. नवीन पध्दतीनुसार ही सोडत काढण्यात आली होती. त्यामुळे पहिल्यांदाच सोडतीनंतर अवघ्या दोन-अडीच महिन्यात विजेत्यांना घराचा ताबा देण्यास सुरुवात झाली. बहुसंख्य विजेत्यांना घराचा ताबा देण्यात आला आहे. हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने विजेते आनंदी आहेत. पण २०२३ च्या सोडतीतील विक्रोळीतील विजेत्यांच्या आनंदावर आता विरजण पडले आहे. काही दिवसांपूर्वीच ताबा घेतलेल्या विक्रोळीतील नव्या कोऱ्या घरात गळती सुरू झाली आहे. संकेत क्रमांक ४१५ योजनेत अत्यल्प गटातील २५८ घरांचा समावेश होता. या घरांसाठी ३६ लाख १६ हजार रुपये अशी किंमत निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार ३६ लाख भरून ताबा घेतलेल्या घरात आता मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याने विजेते हैराण झाले आहेत.
हेही वाचा…विकासकांना तीन बँक खाती बंधनकारक, हिशोबातील गैरप्रकार टाळण्यासाठी ‘महारेरा’चा निर्णय
नवीन घरांची दुरवस्था होण्यास सुरूवात झाल्याने विजेत्यांनी आता म्हाडाच्या, कंत्राटदार शिर्के कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करीत घरांची तात्काळ दुरुस्ती करून देण्याची मागणी विजेत्यांनी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषीविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी विजेत्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, घरांमध्ये गळती सुरू आहेच, पण त्याचवेळी पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि अन्य समस्यांमुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत, अशी माहिती एका विजेत्याने दिली.