तथाकथित क्रिकेटपटू अतुल शर्मा याने आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार विख्यात टेनिसपटू लिएंडर पेस याने केल्यावरून पोलिसांनी शर्माविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लिएंडर पेस आणि त्याची पूर्वीची ‘लिव्ह-इन पार्टनर’ रेहा पिल्लई यांचे संबंध नंतर तणावाचे झाले. गेल्या जून महिन्यात रेहाने लिएंडरविरुद्ध कुटुंब न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार आणि छळाची तक्रार दाखल केली होती. लिएंडरचे वडील वेस पेस यांनी आपल्याला व आपल्या मुलीला वांद्रय़ाच्या कार्टर रोड भागातील आपल्या घरात शिरण्यास मनाई केली, असेही तिने तक्रारीत म्हटले असून आपली मालमत्ता अन्य कुणाला हस्तांतरित करण्यास मनाई करावी अशी विनंतीही केली आहे. लिएंडर पेसने तिचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या मुलीचा आपल्याला कायमस्वरूपी ताबा मिळावा, यासाठी त्यानेही याच न्यायालयात ‘गार्डियनशिप पिटिशन’ केली आहे.
याच केसच्या संदर्भात लिएंडर पेस आणि त्याची मुलगी हे दोघे वांद्रे येथील कुटुंब न्यायालयात गेले होते. शर्माचे रेहासोबत अनैतिक संबंध होते, असे दर्शवणारा पुरावा आपण न्यायालयात सादर केल्यामुळे शर्मा आपल्यावर चिडला होता. त्यामुळे त्याने न्यायालयातच आपल्याला व मुलीला जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पेस याने नोंदवली. त्या आधारे वांद्रे कुर्ला काँप्लेक्स पोलिसांनी अतुल शर्माविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंडलिक निगाडे यांनी दिली.

Story img Loader