गेल्या २० ते २५ वर्षांत प्रथमच; १ ऑक्टोबरला घटस्थापना आणि ३१ ऑक्टोबरला दिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा) असणाऱ्या २०१६ या ‘लीप वर्षां’चे कॅलेंडर १९८८ सालच्या ‘लीपवर्षां’प्रमाणे (तारीख-वार सारखे) आले असल्याने २८ वर्षांनी प्रथमच ५३ शुक्रवार व ५३ शनिवार २०१६ मध्ये आहेत. कारण १९८८ प्रमाणेच २०१६ सालची सुरुवात शुक्रवारने (१ जानेवारी) व शेवटही (३१ डिसेंबर) १९८८ प्रमाणेच शनिवारी होणार आहे.
दिनदर्शिकांचा सखोल अभ्यास करून येणाऱ्या वर्षांची विविधांगाने माहिती देणारे अभ्यासक दीनानाथ द. गोरे यांनी बुधवारी ही माहिती ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. ते म्हणाले, की स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट), शिक्षक दिन (५ सप्टेंबर), सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी (३१ ऑक्टोबर) आणि बालदिन (१४ नोव्हेंबर) हे ४ विशिष्ट दिवस प्रत्येक वर्षी एकाच वाराला येतात. २०१६ सालचे विशेष वरून म्हणजे कित्येक वर्षांत प्रथमच या चारही दिवसांना सार्वजनिक सुट्टी असून, हे चारही दिवस सोमवारी आले आहेत. तसेच १ मे, २ ऑक्टोबर व २५ डिसेंबर या तारखेने मिळणाऱ्या व एकाच वाराला येणाऱ्या ३ सुट्टय़ा, १९८८ प्रमाणेच २०१६ मध्येही रविवारी आल्या आहेत.
प्रथमच श्री गणेशचतुर्थी ५ सप्टेंबरला- शिक्षक दिनाच्या दिवशी सोमवारी आहे. रविवारी ४ सप्टेंबरला हरतालिका आहे.
१९९७ सालच्या तिथी १९ वर्षांनी २०१६ मध्ये येणार असल्याने १९९७ प्रमाणेच २०१६ मध्येही महाशिवरात्र (माघ वद्य त्रयोदशी) ७ मार्चला आणि त्रिपुरारी पौर्णिमा (गुरू नानकजयंती) १४ नोव्हेंबरला असणार आहे.
१९८८ सालाप्रमाणेच २०१६ मध्ये ७, १४, २१, २८ मार्च व नोव्हेंबरला सोमवार असल्याने सोमवारच्या महाशिवरात्रीमुळे महादेवाचे भक्त खुशीत राहतील. बच्चे कंपनीही बालदिनाला खुशीत राहतील, अशीही माहिती गोरे यांनी दिली.
विविध सणांबद्दल सांगताना गोरे म्हणाले, की दिवाळी सण २६ ऑक्टोबर (बुधवार, वसुबारस) ते १ नोव्हेंबर (मंगळवार, भाऊबीज) दरम्यान असल्याने दिवाळीत थंडीची शक्यता कमी आहे.
नवरात्रौत्सव १ ते ११ ऑक्टोबर दरम्यान असल्याने नवरात्रौत्सवात पाऊस असणारच.
व्यापाऱ्यांची दिवाळी ही दिवाळीच्या अगोदर – ११ ऑक्टोबरच्या दसऱ्यालाच होण्याची शक्यता आहे. २०१६ मध्ये एकही अंगारक संकष्ट चतुर्थी नाही. मात्र दोन वेळा (९ जानेवारी व २९ डिसेंबर) मार्गशीर्ष अमावस्या असल्याने मार्गशीर्षमधील गुरुवारच्या लक्ष्मीव्रताचे ६ गुरुवार असणार आहेत.
रथसप्तमी, वटपौर्णिमा, नागपंचमी, हरतालिका आणि लक्ष्मीपूजन अशा पाचअक्षरी पाच सणांना रविवारची सुट्टी आल्याने आणि एका गुरुपुष्यामृत योगाला (१४ एप्रिल) तसेच नारळी पौर्णिमेला (१७ ऑगस्ट) सुट्टी आल्याने समस्त महिला वर्ग खुशीत राहील. पारसी न्यू इयर प्रथमच १७ ऑगस्टला आहे.
२०१६ मध्ये ऑलिम्पिकचे सामने आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याने सर्व जगाचे लक्ष या निवडणुकीकडे व ऑलिम्पिक सामन्यांकडे असणार आहे.
सहावीची पाठय़पुस्तके २०१६ सालात बदलणार असून, प्रथमच मे अखेरीस दहावीचा रिझल्ट लागण्याची शक्यता आहे.
प्रथमच चौथी व सातवीची स्कॉलरशिप परीक्षा २०१६ मध्ये असणार नाही, अशीही शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित माहिती गोरे यांनी दिली.
सुटय़ांची गंमत
बँकवाल्यांची १२ व २४ तारीख तर शालेय विद्यार्थ्यांची १४ व १५ तारीख आवडती ठरणार! १२ मार्च व १२ नोव्हेंबरला दुसऱ्या शनिवारची सुटी बँकेला आहे, १२ सप्टेंबरला सोमवारी बकर ईदची व १२ डिसेंबरला सोमवारीच ईद-ए-मिलादची सुटी आहे. १२ ऑक्टोबरला बुधवारी मोहरमची सुटी असून, १२ जूनला रविवारची सुटी आहे.
शालेय विद्यार्थ्यांना १५ जानेवारीला मकरसंक्रांतीची शुक्रवारी, १५ एप्रिलला श्रीरामनवमीची शुक्रवारीच आणि १५ जुलैला शुक्रवारीच आषाढी एकादशीची सुटी आहे. १५ मे रोजी रविवारची व १५ ऑगस्टला श्रावणी सोमवारी स्वातंत्र्यदिनाची सुटी आहे. १५ सप्टेंबरला अनंतचतुर्दशी असून, शैक्षणिक वर्ष २०१६-२०१७ ची सुरुवात १५ जूनला होईल. १४ फेब्रुवारी व १४ ऑगस्टला रविवारची सुटी असून, १४ नोव्हेंबरला सोमवारी बालदिनाला गुरू नानक जयंतीची सुट्टी आहे.
१४ मे व १४ जून हे दोन दिवस उन्हाळी सुट्टीतील असून, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षांत (१२५ वी जयंती) १४ एप्रिलला गुरुपुष्यामृतयोग यावा हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.
२४ जानेवारी, २४ एप्रिल धूलिवंदनाची गुरुवारी सुट्टी आहे. २४ सप्टेंबर व २४ डिसेंबरला चौथ्या शनिवारची सुट्टी बँकांना असणार आहे. २४ मार्चला जोडून २५ मार्चला गुडफ्रायडेची सुट्टी तर १४ एप्रिलला जोडून १५ एप्रिललाही सुट्टी आहेच.
सातवा वेतन आयोग व सात सोमवारी सुट्टय़ा आल्याने नोकरदार मंडळी खुशीत राहतील. नवरात्रोत्सवात २ शनिवार व २ रविवार असल्याने दांडिया खेळणाऱ्यांना पर्वणी! ११ ऑक्टोबरला दसऱ्याची व जोडून १२ ऑक्टोबरची सुट्टी आहे.