मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारितीतील ११४ अभिन्यासातील इमारती, तसेच भूखंडांचा भाडेपट्टा करार आणि अभिहस्तांतरण संगणकीय पद्धतीने करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यानुसार यासाठी लवकरात लवकर संगणकीय प्रणाली विकसित करण्याचे निर्देश म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ही प्रक्रिया संगणकीय झाल्यास मानवी हस्तक्षेप टाळला जाणार असून प्रक्रिया जलदगतीने होण्यास मदत होणार आहे. ही प्रक्रिया वेगाने झाल्यास म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकासालाही गती मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई म्हाडाचे ११४ अभिन्यास आहेत. या अभिन्यासातील इमारती जुन्या आणि जीर्ण झाल्याने त्यांचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे. त्यानुसार मागील काही वर्षांपासून अनेक वसाहतींचा पुनर्विकास सध्या सुरू आहे. मात्र असे असले तरी अजूनही मोठ्या संख्येने इमारतींचा पुनर्विकास शिल्लक आहे. इमारतींच्या अभिहस्तांतरण न झाल्याने पुनर्विकास रखडल्याचेही काही ठिकाणी आढळले आहे. तर अभिहस्तांतरण प्रक्रियेस वेळ लागत असल्याने वा त्यात मानवी हस्तक्षेप होत असल्यानेही पुनर्विकासास विलंब होत आहे. ही बाब लक्षात घेता जयस्वाल यांनी म्हाडाच्या इमारतींसह भूखंडांचा भाडेपट्टा करार आणि अभिहस्तांतरण संगणकीय पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लवकरात लवकर संगणकीय प्रणाली तयार केली जाणार आहे. यासाठीचे निर्देशही जयस्वाल यांनी गुरुवारी अधिकाऱ्याच्या एका बैठकीत दिले. अभिहस्तांतरणासाठी गृहनिर्माण संस्थांना स्वयंघोषणा पत्र सादर करणे बंधनकारक आहे. स्वयंघोषणा पत्राच्या मसुद्याचाही अंतर्भाव संगणकीय प्रणालीत करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी दिले आहेत.

मुंबई मंडळाकडून गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्टा करारनाम्यावर भूखंड देण्यात आले आहेत. या भूखंडाच्या भाडेपट्टा कराराची प्रक्रिया जलद आणि सोपी व्हावी यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात यावी. तसेच एक खिडकी योजनेद्वारे मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करावी. भाडेपट्टा करारनाम्यासाठी आवश्यक कागदपत्रांची नमुनाबद्ध सूची तयार करावी, असेही निर्देश जयस्वाल यांनी दिले. मुंबईत म्हाडाच्या अडीच लाख सदनिका आहेत. या सदनिकांची संपूर्ण माहिती म्हाडाकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. इमारती, सदनिका, गृहनिर्माण संस्थांची यादी तयार करण्याचे आदेश सर्व विभागीय मिळकत व्यवस्थापकांना देण्यात आले आहेत. तसेच थकीत सेवा शुल्क आणि भूभाड्यापोटीच्या थकीत रक्कमेची माहितीही सादर करण्याची सूचना जयस्वाल यांनी केली. एकूणच म्हाडा अभिन्यासातील इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्याच्या दृष्टीने जयस्वाल यांनी या बैठकीत अनेक निर्णय घेत म्हाडा रहिवाशांना दिलासा दिला.