मुंबई : नागरिकांमध्ये रेबीज लसीकरण, तसेच प्रतिबंधासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने विशेष पुढाकार घेतला आहे. यासाठी जनजागृतीपर संदेश देणाऱ्या चित्रफितींसह एलईडी वाहन तयार करण्यात आले असून या वाहनाद्वारे संपूर्ण मुंबईत जनजागृती करण्यात येणार आहे. या वाहनाच्या माध्यमातून पालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये जनजागृती करण्याचा पालिकेचा मानस आहे.
प्राण्यांपासून मानवाला होणारे रेबीजचे संक्रमण टाळण्यासाठी महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, उप आयुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जनजागृतीपर उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रेबिजमुक्त मुंबईचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने जनजागृती एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महानगरपालिकेच्या वतीने ‘मिशन रेबीज’ या संस्थेच्या सहकार्याने मुंबईतील भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यासाठी २८ सप्टेंबर २०२४ पासून सामूहिक लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या प्राणी प्रेमी संस्थांच्या मदतीने आजवर सुमारे २५ हजारांहून अधिक भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. कलिमपाशा पठाण यांनी दिली.
दरम्यान, नागरिकांमध्ये याविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने एलईडी स्क्रिन आधारित वाहन सज्ज करण्यात आले आहे. याद्वारे रेबीजचे धोके, लसीकरणाचे महत्त्व, जबाबदार पाळीव प्राणी मालकी आणि प्राणी कल्याण प्रोत्साहन, रेबीज प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमध्ये नागरिकांनी सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे आदी बाबींचा समावेश असेल. दाट लोकवस्तीच्या परिसरांवर अधिक लक्ष केंद्रीत केले जाईल, असेही पठाण यांनी नमूद केले.