दिलीप वळसे पाटील यांचा इशारा

महाराष्ट्र ज्ञान महामंडळासंदर्भात भाजपचे राष्ट्रीय चिटणीस डॉ. किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप तथ्यहीन व खोडसाळपणाचे असल्याचे स्पष्ट करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी दिला आहे.  
महामंडळात दोन हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा तसेच त्यात वळसे-पाटील हेही लाभार्थी असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. विशेष तपास पथकाकडून याचा तपास करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली होती. हे आरोप चुकीच्या माहितीवर आधारित असून सोमय्या हे हेतुपुरस्सर आपली प्रतिमा मलीन करण्याचे काम करीत आहेत, असे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले. तथ्यहीन आरोपांना उत्तरही देण्याची गरज नाही. पण जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये, म्हणून स्पष्टीकरण केले
असल्याचे त्यांनी सांगितले. मी कंपनीचा भागधारक किंवा पदाधिकारी नाही. यासंदर्भात कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत असून डॉ. सोमय्या यांनी कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असे वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याची भाजपची मोहीम असून डॉ. सोमय्या यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा ठराव आणणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.    

Story img Loader