ट्रेकिंगच्या निमित्ताने देशाच्या पूर्व सीमावर्ती भागात भटकंती करताना तेथील आरोग्य सुविधांची वानवा लक्षात आल्याने अहमदाबादमधील दंतवैद्यक डॉ. प्रतिभा आठवले गेली १३ वर्षे पूर्वाचलमध्ये नियमितपणे निरनिराळ्या ठिकाणी आरोग्य शिबिरे भरवून दंतचिकित्सा करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांची ही दंतकथा शिबिरांपुरतीच मर्यादित नसून देणगीदारांच्या मदतीने पूर्वाचलमध्ये त्यांनी पाच कायमस्वरूपी चिकित्सा केंद्रे उभारली आहेत.
डॉ. प्रतिभा आठवले मराठीतील दिवंगत ज्येष्ठ समीक्षक प्रा. म. वि.फाटक यांची कन्या. लग्न होऊन अहमदाबादमध्ये स्थायिक असणाऱ्या डॉ. प्रतिभा गेली ३० वर्षे तिथे प्रॅक्टिस करीत आहेत. १९९५ मध्ये कैलास यात्रेदरम्यान त्यांना त्या परिसरात वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याची प्रकर्षांने जाणीव झाली. त्याच वेळी या परिसरात वर्षभरातून काही काळ का होईना मानद स्वरूपाची सेवा द्यावी, असा निश्चय त्यांनी केला. त्यातूनच २००० सालापासून पूर्वाचलमध्ये विवेकानंद केंद्र आणि अभाविपतर्फे दर वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्या दंतचिकित्सा शिबिरे घेत आहेत.
या अनुभवांवर आधारित त्यांचे ‘पूर्वरंग-हिमरंग’ हे पुस्तक काँटिनेन्टल प्रकाशनाने प्रसिद्ध केले. ते पुस्तक वाचून दोन वर्षांपूर्वी चेन्नई येथील माया जोशी यांनी त्यांना कायमस्वरूपी दंतचिकित्सा केंद्र उभारण्यासाठी ७५ हजार रुपयांची देणगी दिली. त्यातून मेघालयमधील गारोहिल्स येथे पहिले दंतचिकित्सा केंद्र कार्यान्वित झाले.
याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या एका राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय परिषदेत डॉ. प्रतिभा आठवले यांनी त्यांच्या पूर्वाचलमधील उपक्रमाचे सादरीकरण केले. ते पाहून चार उद्योजकांनी पूर्वाचलमध्ये चार चिकित्सा केंद्रे उभारण्यासाठी त्यांना प्रत्येकी एक लाखाची देणगी दिली. त्यातून या महिन्यात आसाममधील गोसाईगाम व तेजपूर, मणिपूरमधील इम्फाळ आणि मेघालयमधील जयंती हिल्स येथे चिकित्सा केंद्र कार्यान्वित होत असल्याची माहिती डॉ. प्रतिभा आठवले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
यंदा नागालँडमध्ये शिबीर
दर वर्षी डॉ. प्रतिभा ऑक्टोबर महिन्यात १५ दिवस पूर्वाचलमध्ये असतात. या कालावधीत निरनिराळ्या ठिकाणी त्या शिबिरे घेतात. यंदा चार चिकित्सा केंद्रे कार्यान्वित होणार असल्याने त्यांचा मुक्काम २५ दिवसांचा आहे. या वर्षी प्रथमच त्या नागालँडमध्ये दंतचिकित्सा शिबीर घेणार आहेत. कायमस्वरूपी केंद्रांमध्ये दंतचिकित्सेसाठी लागणारी सर्व आवश्यक यंत्रणा असून देशभरातील दंतवैद्यकांनी वर्षभरातून काही काळ पूर्वाचलमध्ये येऊन वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात, असे आवाहन डॉ. प्रतिभा आठवले यांनी केले आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legend of a sensitive creativity dr pratibha athavale starts five medical centers in purvanchal
Show comments