मुंबई : माझ्या माई, बाबा आणि दिदीचा आशीर्वाद आहे, म्हणूनच आज या भव्यदिव्य ताज हॉटेलसमोरील ऐतेहासिक गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार मी स्वीकारत आहे, मी महाराष्ट्राची मुलगी आहे आणि आज मला माहेरी आल्यासारखे वाटत आहे. मुलगी बऱ्याच दिवसांनंतर माहेरी आली की तिचे कौतुक होते, तसे आज मला वाटत आहे. डोक्यावरून, पाठीवरून मायेचा हात फिरवत आहेत. आजपर्यंत मी उभी आहे, गात आहे आणि तुमच्या प्रेमामुळे कायम गात राहणार आहे. महाराष्ट्र भूषण हा माझ्यासाठी भारतरत्न आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा आहे, कारण मला तो माझ्या घराच्यांकडून मिळाला आहे. माझ्या घरच्यांना माझी अजूनही आठवण आहे हे मला बघायचे होते. त्यासाठी मी आतापर्यंत थांबले आहे, अशा भावना ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केल्या.
गेली अनेक दशके आपल्या सुमधुर स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आशा भोसले यांना शुक्रवारी (२४ मार्च रोजी) सायंकाळी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. २०२१ या सालासाठी आशा भोसले यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. २५ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारचे स्वरूप आहे.
‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार आशा भोसले यांना देण्याची संधी आम्हाला मिळाली, त्यामुळे आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची आशाताईंच्या कर्तृत्वासमोर छोटी आहे. हा पुरस्कार त्यांना दिल्यामुळे या पुरस्काराचीच उंची वाढली आहे’, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. तर ‘आपण नेहमी म्हणतो की शतकामध्ये एकच लता मंगेशकर होतात. पण हेही मान्य केले पाहिजे की शतकामध्ये दुसऱ्या आशा भोसले देखील होत नाहीत, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘महाराष्ट्र भूषण २०२१’ हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, मीना मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, अभिनेते सचिन पिळगावकर, गायक अनु मलिक, उदित नारायण, आनंदजी विरजी शाह, अभिनेते जॅकी श्रॉफ, अभिनेत्री श्रद्धा कपूर आदी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित होते.
यावेळी यावेळी आशा भोसले यांनी ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ हे गीतही गायले.
रसिकांना स्वरमग्न करणारा आशा भोसले यांच्या सदाबहार गीतांचा ‘आवाज चांदण्यांचे’ हा कार्यक्रम सुदेश भोसले, साधना सरगम, ऋषिकेश कामेरकर, आर्या आंबेकर, बेला शेंडे, मधुरा दातार यांनी सादर केला.
८० वर्षांच्या वैभवशाली सांगीतिक कारकिर्दीत आशा भोसले यांनी गायलेली विविध गाणी यावेळी कलाकारांनी सादर केली. तर अभिनेता सुमित राघवन याने या कार्यक्रमाचे निवेदन केले. तर या संपूर्ण पुरस्कार सोहळय़ाचे सूत्रसंचालन मीनल जोगळेकर यांनी केले.
उपसभापतींचे नाव पत्रिकेवर नसल्याने आमदारांची नाराजी
मुंबई: महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण पत्रिकेतील मान्यवरांची नावे ही राजशिष्टाचार विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे छापली आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे नाव छापले नाही. मात्र त्यांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत केले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभापती आणि अध्यक्ष ही दोन्ही पदे अराजकीय आहेत, सामान्य प्रशासन विभागाच्या सूचनेनुसार कार्यक्रम पत्रिकेतील नावे छापली आहेत, असे सांगितल्याने वादावर पडदा पडला.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळय़ाच्या पत्रिकेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे छापले नाही. याबाबत सभापतींच्या दालनात चर्चा झाली. तरीही हा प्रकार पुन्हा घडला आहे. याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
आमदार भाई जगताप म्हणाले, हा विषय सभापतींच्या मानसन्मानाचा आहे. या सदनाच्या काही प्रथा, परंपरा आहेत. हे सभागृह याला अनूसरून चालते. हे वरिष्ठ सभागृह आहे. त्यामुळे या सभागृहाच्या सभापती, उपसभापतींना विशेष मान आहे.
आशाताईंना पुरस्कार देताना खऱ्या अर्थाने मला आज मुख्यमंत्री झाल्याचे सार्थक वाटत आहे. राजसत्ता किंवा सत्तेची खुर्ची मिळवणे एकवेळ सोपे असते. परंतु लहानांपासून, तरुणांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सगळय़ांच्या मनावर अधिराज्य करणे सोपे नसते, ते आशाताईंनी सोपे करून दाखविले आहे.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
शतकामध्ये एकच लता मंगेशकर होतात. पण हेही मान्य केले पाहिजे की शतकामध्ये दुसऱ्या आशा भोसले देखील होत नाहीत. अष्टपैलू या शब्दाची व्याख्या आहे, आशाताई भोसले. त्या तरुण पिढीसाठी प्रेरणा आहेत.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री