हिंदीसह विविध भारतीय प्रादेशिक भाषांमधील गाण्यांवर आपल्या जादुई आवाजाचा ठसा उमटवून ती गाणी अजरामर करणाऱ्या मन्ना डे यांनी मराठी चित्रपटातील काही गाण्यानाही आपला आवाज दिला होता. मन्ना डे यांच्या स्वरांची मोहोर उमटेलेल्या अनेक गाण्यांपैकी काही गाण्यांनी अमाप लोकप्रियता मिळविली. यापैकी अनेक गाणी रसिकांच्या आजही ओठावर आहेत. संत नामदेव, संत तुकाराम आदी संतांच्या काही रचनाही मन्ना डे यांनी गायल्या होत्या.
मराठीत सी. रामचंद्र, वसंत देसाई, सुधीर फडके, राम कदम, वसंत पवार, स्नेहल भाटकर, प्रभाकर जोग, अण्णा जोशी आदी संगीतकारांनी मन्ना डे यांच्या आवाजाचा खूप चपखलपणे वापर करून घेतला. मन्ना डे यांचे आजही लोकप्रिय असणारे आणि मराठी वाद्यवृंदातून हमखास गायले जाणारे गाणे ‘घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा’ हे ‘वरदक्षिणा’ चित्रपटातील गाणे. ग. दि. मागडुळकर यांचे गीत आणि वसंत पवार यांचे संगीत असलेले हे गाणे म्हणजे मन्ना डे यांनी मराठीत गायलेल्या गाण्यातील एक अग्रणी गाणे आहे. ‘एक धागा सुखाचा’ या चित्रपटातील ‘अ आ आई, म म मका, मी तुझा मामा, दे मला मुका’ हे आणखी एक लोकप्रिय गाणे. मधुसूदन कालेलकर यांचे गीत राम कदम यांनी संगीतबद्ध केले होते. संत गाडगे महाराज यांच्या जीवनावरील चित्रपटातील ‘गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला’ हे गाणेही खूप लोकप्रिय आहे. हेग. दि. माडगुळकर यांचे असून संगीत राम कदम यांचे होते. मन्ना डे यांनी मराठीत गायलेले ‘धुंद आज डोळे, हवा धुंद झाली’ हे आणखी एक लोकप्रिय गाणे. ‘दाम करी काम’चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांच्या या गीताला प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केले होते.
संगीतकार सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेले ‘नंबर फिफ्टी फोर, हाऊस इज बांबू डोअर’ (चित्रपट-घरकुल. गीत-शांता शेळके) हे गाणे मन्ना डे यांच्यासमवेत प्रमिला दातार यांनी गायले होते. ‘हॅप्पी जॉल्ली सारे, आनंदाने गाऊ, होम स्वीट होम’ (चित्रपट- ‘जावई विकत घेणे आहे’, संगीत-सुधीर फडके) या गाण्यात मन्ना डे यांच्याबरोबर आशा भोसले, जयवंत कुलकर्णी यांचाही आवाज आहे. ही दोन्ही गाणीही लोकप्रिय आहेत.
मराठीत गायलेली गाणी
आधी रचिली पंढरी, आम्ही जातो आमुच्या गावा,चला पंढरीसी जाऊ, जय जय हो महाराष्ट्राचा (धन्य ते संताजी धनाजी), तु माझ्या स्वप्नातली कल्पना (सावली प्रेमाची), दूर व्हा सजणा येऊ नका (या मालक), प्रीत रंगली ग कशी राजहंसी (श्रीमान बाळासाहेब), हा दु:ख भोग सारा माझा मला उरावा (चिमुकला पाहुणा), सांग सखे सांग ना (नंदादीप), मी धुंद, तू धुंद यामिनी (मीच तुझी प्रीत)    
मराठीतील ज्या अभिनेत्यांना मन्ना डे यांचा आवाज मिळाला ते अभिनेते आणि कंसात त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे
डॉ. श्रीराम लागू (गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला), शरद तळवलकर (अ आ आई, म म मका या गाण्यासाठी), विष्णुपंत जोग (घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा) राजा दाणी (धुंद आज डोळे, हवा धुंद झाली), अरुण सरनाईक (मी धुंद, तू धुंद यामिनी)   

Story img Loader