मुंबई : स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने पेपरफुटीसंदर्भात केंद्र सरकारने कायदा केला आहे. राज्यातही अशा प्रकारचा कायदा आणण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. पेपरफुटी व गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी याच अधिवेशनात कायदा आणणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिली. महायुती सरकारने दोन वर्षांत एक लाख पदे भरण्याची ऐतिहासिक कामगिरी केली असून यापुढे गट ‘क’ च्या जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मृत आणि जलसंधारण विभागाच्या भरतीप्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांच्यासह बाळासाहेब थोरात राजेश टोपे, आशीष शेलार, भास्कर जाधव, अनिल देशमुख, प्रकाश आबिटकर, रोहित पवार आदींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान फडणवीस बोलत होते. मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत राजपत्रित पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. फेरपरीक्षा घेण्याबाबत आणि या परीक्षेशी संबंधित गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असून या परीक्षा टीसीएस आणि आयबीपीएसतर्फे होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले, तसेच तलाठी भरतीमध्ये उत्तर चुकल्याने आपण ती परीक्षा रद्द केली. या परीक्षेच्या व्यतिरिक्त पेपरफुटीबाबत एकच गुन्हा दाखल झालेला आहे. त्याव्यतिरिक्त राज्यात भरतीसाठी घेण्यात आलेल्या कोणत्याही परीक्षेत गैरप्रकार झालेला नसून त्याबाबत गुन्हाही दाखल झालेला नसल्याचा दावाही त्यांनी केला. केंद्र सरकारने पेपरफुटीबाबतचा कायदा केला आहे. राज्य सरकारनेसुद्धा याबाबतचा कायदा करण्याचा मनोदय मागील अधिवेशनात व्यक्त केला होता. त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू असून याच अधिवेशनात आम्ही पेपरफुटीबाबतचा कायदा आणणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा >>>देवनारमधील दफनभूमीचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

राज्य सरकारने ७५ हजार पदे भरण्याची घोषणा केली होती. त्यानुसार विविध विभागांत पारदर्शी पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून दोन वर्षांत एक लाख पदे भरण्याची ऐतिहासिक कामगिरी सरकारने केल्याचा दावा त्यांनी केला. ७५ हजारांपैकी ५७ हजार ४५२ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर १९ हजार ८५३ जणांना नियुक्तीचे आदेश देण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच ३१ हजार २०१ पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. भरती प्रक्रियेतील परीक्षेसाठी यापुढे परीक्षा केंद्रावर उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

खोटे कथानक पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल

भास्कर जाधव यांनी एका व्हायरल मेसेजच्या आधारे महायुती सरकारच्या काळात अनेक परीक्षांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला. फडणवीस यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला. आपण ज्याच्या आधारे आरोप केलेत तो व्हॉटसअप मॅसेज असून आपणही त्याची कोणतीही शहानिशा केली नाही. अशाच प्रकारे स्पर्धा परीक्षा आणि पेपरफुटीबाबत संकेतस्थळ, व्हॉट्सअपच्या माध्यमातून खोटे कथानक पसरवून तरुणांना भडकवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे असे संदेश पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.