मुंबई : विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने (शिंदे) काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी तर राष्ट्रवादीने (अजित पवार) पक्षाचे जुनेजाणते पदाधिकारी संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर केली. पाच जागांसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होणार आहे.
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारपर्यंत होती. भाजप तीन, राष्ट्रवादी व शिवसेनेने प्रत्येकी एक तर एका अपक्षाने अर्ज दाखल केला. अपक्ष उमेदवाराच्या अर्जावर सूचक व अनुमोदक म्हणून आमदारांच्या स्वाक्षऱ्या नसल्याने हा अर्ज छाननीत बाद होईल. भाजपचे संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे, राष्ट्रवादीचे (अजित पवार) संजय खोडके, शिवसेनेचे (शिंदे) चंद्रकांत रघुवंशी या पाच जणांची बिनविरोध निवड होणार आहे. भाजपच्या तिघांची आमदारकीची मुदत मे २०२६पर्यंत आहे. राष्ट्रवादीचे खोडके यांची मुदत २०३० पर्यंत तर शिवसेनेचे रघुवंशी यांची मुदत २०२८ पर्यंत आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीने उमेदवारांबाबत शेवटपर्यंत गुप्तता पाळली होती. शिवसेनेने (शिंदे) माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी जाहीर केली. धुळे, नंदूरबार जिल्ह्यांमध्ये पक्ष वाढविण्याची जबाबदारी शिंदे यांनी रघुवंशी यांच्यावर सोपविली आहे. रघुवंशी यांच्या उमेदवारीमुळे संजय मोरे, शीतल म्हात्रे, शहाजी पाटील आदी इच्छुकांचा हिरमोड झाला. राष्ट्रवादीने (अजित पवार) पक्षाचे जुनेजाणते पदाधिकारी संजय खोडके यांना उमेदवारी दिली. पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीच्या उमेदवार निवड, संसदीय मंडळाची बैठक, मंत्र्यांची बैठक यात खोडके यांचा सहभाग असायचा. एकत्रित राष्ट्रवादीत शरद पवार व फुटीनंतर अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ते पक्षात ओळखले जातात.
पती पत्नी आमदार
संजय खोडके यांची पत्नी सुलभा खोडके या विधानसभेत अमरावती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या वतीने निवडून आल्या आहेत. आता संजय खोडके यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली. विधिमंडळात वडील व मुलगा, वडील व मुलगी, भाऊ-भाऊ, भाऊ-बहिण, सासरा व जावई, दीर-भावजय अशा जोड्या झाल्या आहेत. आता खोडके पती-पत्नीची आमदारांची जोडी आली आहे.
हे बिनविरोध
● संदीप जोशी
● संजय केनेकर
● दादाराव केचे (भाजप)
● संजय खोडके (राष्ट्रवादी)
● चंद्रकांत रघुवंशी (शिवसेना )