मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच अधिकृत असल्याचा स्पष्ट निकाल निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. शिंदे यांच्याच नेतृत्वात शिवसेना योग्य मार्गावर आहे. त्यामुळेच महिलांच्या सक्षमीकरण आणि उत्कर्षांसाठी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी जाहीर केले. शिंदे गटात प्रवेश करताच भाजपने त्यांच्या विरोधात मांडलेला अविश्वासाचा ठराव लगेचच मागे घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. गोऱ्हे यांनी शिवेसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, प्रवीण दरेकर उपस्थित होते. अयोध्येत राम मंदिर, समान नागरी कायद्याबाबत सकारात्मक पावले, तलाक पीडित महिलांना न्याय, काश्मीरमध्ये तिरंगा, बाळासाहेबांनी ज्या भूमिकांसाठी आयुष्य समर्पित केले त्यांच्यासाठी काम केले जात आहे. त्यामुळे आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच कोणत्याही सटरफटर लोकांमुळे नाराज होण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांना लगावला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भूमिकांवर आयुष्य समर्पित केले, त्या भूमिकांचा सन्मान करून मोदी-शहा काम करीत असल्याचे त्या म्हणाल्या.

मविआ सरकार अहंकाराने भरले होते – मुख्यमंत्री

महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळे अहंकाराने भरले होते. सर्वाना प्रचंड इगो होता. त्यामुळे अनेक लोकहिताचे प्रकल्प राजकीय सूडबुद्धीतून बंद करण्यात आले होते, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आमचे सरकार येताच लोकहिताच्या प्रकल्पांना चालना दिली. बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून  राज्याला पुरेसा निधी मिळत असून राज्याच्या विकासाला वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडून निधी मिळत नसल्याची ओरड करीत होते. मात्र कोणी निधी आणून देत नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात असा टोलाही त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.  

सहानुभूतीसाठीच वयाचा मुद्दा – फडणवीस 

नीलम गोऱ्हेंनी अतिशय चांगला निर्णय घेतल्याचे सांगत फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जशा सभा होतील, तशाच सभा अजित पवार आणि आम्हीही करणार आहोत. तसेच वांरवार पवार यांच्या वयाचा उल्लेख करून साहनुभूती मिळविण्याचा प्रयत्न शरद पवार यांचे समर्थक करीत आहेत, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

भारिप, शिवसेना ते शिंदे गट प्रवास 

नीलम गोऱ्हे यांनी राजकीय कारकीर्दीस भारिपमधून सुरुवात केली होती. त्यांनी ईशान्य मुंबईतून लोकसभेची निवडणूकही लढविली होती. १९९८ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. २००२ पासून शिवसेनेने त्यांना चार वेळा विधान परिषदेची आमदारकी दिली. तसेच २०१९ मध्ये त्यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली. आपले उपसभापतीपद वाचविण्यासाठीच नीलमताईंनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जातो. ‘शिवसेनेने चार वेळा आमदारकी, उपसभापतीपद दिले. तरीही त्यांना पक्ष सोडावासा वाटला यावरून त्यांची हाव लक्षात येते, अशी टीका शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केली.

ठाकरे गटाचा तिसरा आमदार शिंदे गटात

विधान परिषदेत शिवसेनेचे ११ आमदार होते. यापैकी दोघांनी आधीच शिंदे गटात प्रवेश केला होता. आता गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या आमदारांची संख्या ८ झाली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legislative council deputy speaker neelam gorhe also joined the shinde group ysh