राज्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर मंगळवारी विधान परिषदेत प्रदीर्घ चर्चा झाली. खैरलांजीपासून ते खडर्य़ातील दलितांवरील अत्याचाराच्या ताज्या घटनेबद्दल आणि शक्ती मिल बलात्कार प्रकरणापासून ते कर्जतमधील एका आश्रमातील मुला-मुलींवर लैंगिक शोषणाबद्दल सर्वच पक्षाच्या सदस्यांनी गृह खात्याच्या कारभारावर टीका केली. परंतु आठवडय़ाभरापूर्वी घडलेल्या पुण्यातील एका निरपराध मुस्लिम तरुणाच्या हत्येबद्दल कुणीही ब्रसुद्धा काढला नाही. अतिशय क्रूर व निंदनीय अशा या घटनेचा विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांच्यासह सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सदस्यांनाही विसर पडला.
गेले दोन दिवस पुढे ढकलण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या कायदा व सुव्यवस्थेवरील प्रस्तावावर सायंकाळी पाच वाजता चर्चा सुरू झाली. विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, शिवसेनेचे दिवाकर रावते व अन्य विरोधी सदस्यांनी मांडलेल्या या लेखी प्रस्तावात दलितांवरील व महिलांवरील वाढत्या अत्याचाराची खैरलांजीपासून ते खडर्य़ाच्या घटनेपर्यंतचा उल्लेख करण्यात आला होता. उस्मानाबाद जिल्’ाातील कनगरा गावात दारुबंदीची मागणी करणाऱ्या नागरिकांनाच पोलिसांनी कसे झोडपून काढले, अशा अनेक घटनांचा उल्लेख करण्यात आला. परंतु फेसबूकवरील महापुरुषांच्या बदनामीचे निमित्त करून पुण्यातील मोहसिन सादिक शेख या तरुणाची हत्या करण्यात आली, त्याला मात्र या प्रस्तावात स्थान मिळाले नाही.
विनोद तावडे यांनी दलितांवरील व महिलांवरील अत्याचाराची प्रकारणे पोटतिडकीने मांडली. कर्जत तालुक्यातील एका अनधिकृत आश्रमातील लहान मुला-मुलींवर झालेल्या लैंगगिक शोषणाचाही धिक्कार करण्यात आला. राज्यात कायदा व सुववस्थेचा कसा बोजवारा उडालेला आहे, याची उदाहरणे सांगितली. परंतु पुण्यात काही दिवसापूर्वी घडलेल्या मुस्लिम युवकाच्या हत्येमुळे धार्मिक व सामाजिक तणाव वाढला, त्याचा उल्लेख त्यांनी कुठेही केला नाही.
या चर्चेत राहुल नार्वेकर, नीलम गोऱ्हे, भाई जगताप, कपील पाटील, शोभा फडणवीस, विद्या चव्हाण, भाई गिरकर, किरण पावस्कर, जयदेव गायकवाड, हेमंत टकले व हरिभाऊ राठोड आदी सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी भाग घेतला. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी दलित व महिलांवरील अत्याचाराबद्दल सरकारवर खास करुन गृह खात्याच्या कारभारावर व पोलिसांच्या वर्तनावर टीकेची झोड उठविली. परंतु सर्वच पक्षाच्या सदस्यांना सामाजिक चिंता निर्माण करणाऱ्या मोहसिन शेख या निरापराध तरुणाच्या हत्येच्या घटनेचा विसर पडला. त्याबद्दल कुणीही ब्र शब्द काढला नाही.

धनंजय देसाई याला अटक
पुणे : हडपसर येथे निर्माण झालेल्या तणावानंतर आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाच्या खुनामध्ये हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या खुनाच्या गुन्ह्य़ात देसाईला अटक करण्यास न्यायालयाने मंगळवारी परवानगी दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. शेखच्या खुनामध्ये देसाईसह दोघांना अटक केल्यामुळे या गुन्ह्य़ात अटक आरोपींची संख्या आता २१ झाली आहे. फेसबुकवर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकल्यानंतर हडपसरमधील बनकर वस्तीमध्ये काही तरुणांनी मोहसीन सादीक शेख (२८) याचा खून केला होता. या प्रकरणी आतापर्यंत १९ जणांना न्यायालयाने १२ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते आहेत.