आरे कॉलनीमध्ये याआधी अनेकदा बिबट्याचं स्थानिकांना दर्शन झालं आहे. वन परिसर असल्यामुळे वन्यजीवांचा या भागात अधून-मधून वावर दिसून येतो. असाच एक बिबट्या दोन दिवसांपूर्वी आरे कॉलनीमध्ये दिसून आला होता. या बिबट्याने आरे कॉलनीत राहणाऱ्या एका वृद्ध महिलेवर झडप घातल्याचं सीसीटीव्हीमधून समोर आल्यानंतर वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने कारवाई सुरू केली. आरे कॉलनी परिसरामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास या चारपैकी एका पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, नंतर हा बिबट्या नसून ते बिबट्याचं पिल्लू असल्याचं स्पष्ट झालं आहे.

आरे कॉलनी परिसरामध्ये बिबट्याचे हल्ले झाल्याच्या काही घटना गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्या आहेत. वनविभागाच्या हवाल्याने एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, या परिसरामध्ये तीन बिबटे असून ते स्थानिकांवर हल्ले करत आहेत. त्यांना पकडण्यासाठी वनविभागाने मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे पिंजरे लावण्यात आले होते. मात्र, त्यात बिबट्याचं पिल्लू सापडलं आहे. या पिल्लाला तातडीने संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये हलवण्याच आल्याची माहिती देण्यात आली आहे.

संध्याकाळी अंधार पडल्यानंतर या भागात बिबट्या लोकांवर हल्ले करत असल्याचं समोर आलं होतं. नुकताच बुधवारी एका बिबट्याने आरे कॉलनीमध्ये एका ५५ वर्षांच्या वृद्ध महिलेवर हल्ला केला होता. त्यापाठोपाठ गुरुवारी रात्री एका १९ वर्षीय तरुणावर देखील बिबट्याचा हल्ला झाल्याची माहिती मिळाली होती.

आरे कॉलनीतील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!

आरे कॉलनीत वृद्ध महिलेवर बिबट्यानं केलेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाली होती. व्हिडीओत आरे डेअरी परिसरात हा बिबट्या आल्याचं दिसत आहे. यानंतर काही वेळातच तिथे एक वृद्ध महिला चालत येताना दिसते. नीट चालायला जमत नसल्याने महिलेने काठीचा आधार घेतलेला होता. निर्मला देवी सिंग असं या ५५ वर्षीय महिलेचं नाव असून काही वेळाने त्या तिथे पायरीवर बसतात. यावेळी आपल्या मागे बिबट्या बसला आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती.

काही वेळाने बिबट्या महिलेच्या दिशेने पावलं टाकत येतो आणि काही कळण्याआधीच हल्ला करतो. यावेळी महिला हातातल्या काठीने प्रतिकार करण्यास सुरुवात करते. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खाली जमिनीवर पडलेल्या महिलेवर बिबट्या पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मात्र महिलेचा प्रतिकार पाहता काही वेळाने तो तिथून पळ काढत असल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे.

Story img Loader