मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या निवारा केंद्रातील भीम या नऊ वर्षांच्या बिबटय़ाचा सोमवारी सकाळी साडेसात वाजता मृत्यू झाला.
भीम याचा मृत्यू हृदयक्रिया बंद पडल्याने झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. त्याला शहापूर येथून २०१० साली लहान असताना आणण्यात आले होते. तो अनाथ होता. त्यामुळे आईकडून मिळणारे शिकारीचे प्रशिक्षण त्याला मिळाले नाही. तो शिकार करू शकत नसल्याने त्याला जंगलात सोडण्यात आले नव्हते. त्यांचा सांभाळ निवारा केंद्रातच करण्यात आला.
एकाच ठिकाणी राहिल्यामुळे शारीरिक हालचाल होत नाही. परिणामी असे प्राणी लठ्ठ होतात आणि त्यांना हृदयविकाराचा धोका संभवतो, असे वन्यजीव तज्ज्ञांनी सांगितले.
भीम बिबटय़ाच्या मृत्यूनंतर संध्याकाळी ४.४५ वाजता मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील चिकित्सकांनी त्याचे शवविच्छेदन केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भीमला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दत्तक (आहाराचा खर्च) घेतले होते.
भीमबरोबरच आणखी एक बिबटय़ाचे पिल्लू सापडले होते. त्याचे नाव अर्जुन असे होते. ‘निवारण केंद्रामध्ये २०१०मध्ये आणलेल्या भीम आणि अर्जुन या दोघांचे डोळेदेखील उघडत नव्हते, इतके ते लहान होते. त्यानंतर निवारा केंद्रातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची अत्यंत निगुतीने काळजी घेतली होती. सुरुवातीला बाटलीने दूध पाजून, तर नंतर सूप देऊन त्यांना वाढवण्यात आले’ असे तत्कालीन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांनी सांगितले.
शहापूरच्या जंगलात २०१०मध्ये वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गस्तीवर असताना बिबटय़ाच्या आवाजाचा मागोवा घेतला असता भीम आणि अर्जुन त्यांना आढळले होते. दोन दिवस लक्ष ठेवूनही त्यांची आई त्यांच्याकडे फिरकली नाही. त्यामुळे त्यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील निवारा केंद्रात आणण्यात आले होते.