मुंबई संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी न्यू दिंडोशी येथील परिसरात मुक्त संचार करणारा बिबट्या मंगळवारी पहाटे वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. न्यु दिंडोशी परिसरातील नागरी वस्तीमध्ये ६ व ७ मार्च रोजी सलग दोन दिवस मध्यरात्री बिबट्या परिसरातील बंगल्यांच्या आवारात फिरताना आढळला होता.
हेही वाचा >>> मुंबई : अश्लील चित्रफितीच्या माध्यमातून व्यावसायिकाकडून चार लाखांची खंडणी
बिबट्याचा वावर असल्याचे लक्षात आल्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्यावर लक्ष ठेवण्यासाठी तीन कॅमेरा टॅ्प्स आणि पिंजरा लावला होता. बिबट्या मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास पिंजऱ्यात सापडल्याची माहिती मिळाली. परिसरातील वाढत्या कचऱ्यामुळे तेथे भटक्या कुत्र्यांचे प्रमाणही वाढले हेच भटके कुत्रेे भक्ष्य म्हणून मिळत असल्याने बिबटे मानवी वस्तीत येऊ लागले. जेरबंद करण्यात आलेला बिबट्या वनविभागाच्या ताब्यात असून त्याची वनविभाग, पशुवैद्यांमार्फत तपासणी केली जात आहे. बिबट्याची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेतला जाईल, असे डीसीएफ संतोष सस्ते यांनी सांगितले.