रस्त्यात बिबळ्या दिसल्याने गाडीचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एका केमिकल अभियंत्याला आपला प्राण गमवावा लागला तर पाच अन्य जण जखमी झाले. गुरुवारी पहाटे भांडुप संकुलात ही दुर्घटना घडली. देवधूत चंद्रा (२५) असे या अपघातात ठार झालेल्या अभियंत्याचे नाव आहे.
 डिग्नी मेंटो या कंपनीत केमिकल अभियंता म्हणून देवधूत कामाला होता. तो मालाडच्या मार्वे येथे राहणारा होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धी प्रकल्पात रसायने टाकण्याचे काम डिग्नी मेंटो ही कंपनी करते. पालिकेचे कंत्राट या कंपनीला मिळाले आहे. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास देवधूत भांडुप येथील महानगरपालिका संकुल परिसरातील जलशुद्धी प्रकल्पात नेहमीप्रमाणे रसायन टाकण्यासाठी निघाला होता. गाडीमध्ये चालक दत्तात्रय वरख आणि अन्य पाच सहकारी होते. संकुलाच्या गेटच्या एक किलोमीटर आधी चालक वरखला अंधारात बिबळ्या रस्त्यातून आडवा जाताना दिसला. अचानक बिबळ्या समोर आल्याने भेदरलेल्या चालक वरख याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची गाडी जवळच्या एका झाडावर आदळली. हा अपघात एवढी भीषण होता की चालकाच्या शेजारी बसलेला अभियंता देवधूत जागीच ठार झाला. चालक वरखच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. गाडीत मागे बसलेल्या पाच जणांना किरकोळ दुखापत झाली. भांडुप संकुल परिसरात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चालकावर निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. केवळ बिबळ्या समोर आला म्हणून चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडल्याचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश कुलट यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा