आयआयटी मुंबईच्या संकुलात बुधवारी नेहमीप्रमाणेच वर्दळ होती. एरवी या परिसराला बिबटय़ाचा वावर नवीन नाही. मात्र, बुधवारी एका बिबटय़ाने थेट मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेच्या प्रयोगशाळेतच मुक्काम ठोकत सर्वाची भंबेरी उडवून दिली. ही प्रयोगशाळा त्या बिबटय़ाला एवढी आवडली की त्याने रात्री उशिरापर्यंत वनाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना दाद दिली नव्हती. बिबटय़ाला जेरबंद करण्याचे वनखात्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरूच होते.
मेकॅनिकल शाखेतील कर्मचाऱ्याने बुधवारी नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता प्रयोगशाळेचे शटर उघडले. तेव्हा त्याला समोर बिबटय़ा दिसला. त्याक्षणी त्याने भीतीने पुन्हा शटर बंद करून घेतले आणि ही माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांना दिली. यानंतर संकुलात धावपळ सुरू झाली आणि वन अधिकाऱ्यांना पाचरण करण्यात आले. वन अधिकाऱ्यांनी प्रयोशाळेत दोन ठिकाणी जाळे लावले. मात्र, बिबटय़ा काही केल्या या जाळ्यात सापडत नव्हता. रात्री उशिरापर्यंत बिबटय़ाला पकडण्यासाठी वन अधिकाऱ्यांची पळापळ सुरू होती.
१०-१२ दिवसांपूर्वी मुलांच्या वसतिगृहाच्या बाहेर दोन बिबटे दिसले होते. मागच्या वर्षीही याच ठिकाणी विद्यार्थ्यांना दोन बिबटे दिसले होते. दर वर्षी पावसाळ्याच्या काळात या परिसरात बिबटय़ांचा वावर असल्याचे विद्यार्थी सांगतात.

Story img Loader