मुंबईजवळच्या ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’तील बिबळ्यांनाही जणू या महानगरीची बाधा झाली आहे. महानगरीप्रमाणे येथील बिबळ्यांची संख्या २१वरून ३५वर गेली आहे. परंतु या १०४ चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या या उद्यानात बिबळ्यांना आवडणारे चितळ, सांबर आदी खाद्य मुबलक प्रमाणात असूनही त्यांना बाहेरच्या ‘इन्स्टंट’ खाण्याची चटक लागली आहे. त्यामुळे उद्यानात व आजूबाजूच्या मानवी वस्तीत सहजासहजी पकडता येतील अशी कुत्री, मांजरी, शेळ्या ही बिबळ्यांच्या आहाराचा प्रमुख भाग बनू लागली आहेत.
‘भारतीय वन्यजीव संस्थे’चे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी निकित सुर्वे यांनी उद्यानातील ६० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने सहा महिने पाहणी करून एक अहवाल तयार केला आहे. बिबळ्यांची संख्या मोजण्याबरोबरच त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींचा अभ्यास या पाहणीत करण्यात आला आहे. यात बिबळ्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीत झालेला हा महत्त्वपूर्ण बदल नोंदविण्यात आला आहे.
या पाहणीकरिता उद्यान आणि आरे कॉलनी परिसरातील तब्बल १४० चौरस किलोमीटर परिसरात एकूण ४५ कॅमेरे बसविण्यात आले होते. बिबळ्यांचे केलेले चित्रीकरण, त्यांची विष्ठा, ठसे आदींचा एकत्रितपणे शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करण्यात आला. यात बिबळ्यांची संख्या ३५ वर पोहोचल्याचे आढळून आले आहे. २०११मध्ये केलेल्या पाहणीत २१ बिबळे आढळून आले होते. चितळ, सांबर, माकड हे प्राणी बिबळ्यांचे खाद्य. बिबळ्यांना वर्षांला ५२ ते ५५च्या आसपास प्राणी खाद्य म्हणून लागतात. उद्यानात हे प्रमाण एका बिबळ्यामागे ३०० इतके प्रचंड आहे. तरीही बिबळे बाहेरच्या पाळीव प्राण्यांकडे वळत आहेत. आता तर उद्यान आणि परिसरातील कुत्री, मांजरी, शेळ्या, गायी आदी पाळीव प्राण्यांच्या रक्ताची चटकही आता बिबळ्यांना लागली आहे. शिवाय हे पाळीव प्राणी पकडण्यासाठी मेहनतही फार घ्यावी लागत नाही. म्हणूनच येथील बिबळ्यांमध्ये या प्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती सुर्वे यांनी दिली. याकरिता बिबळे उद्यानाची वेस ओलांडून मानवी वस्तीत शिरतात. परंतु त्यांचे लक्ष्य कुत्री व इतर पाळीव प्राणी असल्याने त्या तुलनेत माणसांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढलेले नाही, याकडे वन अधिकारी संतोष सस्ते यांनी लक्ष वेधले.

हेही आढळले
चित्रीकरणातील बिबळ्यांमध्ये १० नर, १६ माद्या आढळून आल्या. रानमांजर, माऊस डीअर, रस्टी स्पॉटेड कॅट असे काही दुर्मीळ प्राणीही आढळून आले.

कुत्री महत्त्वाचे खाद्य
बिबळ्यांच्या विष्ठेतील घटकांची चाचणी केली असता त्यात तब्बल ४३ टक्के घटक हे पाळीव प्राण्यांचे आढळून आले. त्यात कुत्र्यांचे प्रमाण हे तब्बल २४.४६ टक्के इतके प्रचंड होते. ५७ टक्के बिबळे वन्य प्राण्यांवर खाद्य म्हणून अवलंबून आहेत, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

Story img Loader